जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण मोहीम
esakal February 08, 2026 03:46 AM

जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण मोहीम
पालघरमध्ये १० ते २३ फेब्रुवारीदरम्यान औषधांचे वाटप

पालघर, ता. ७ (बातमीदार) : हत्तीरोगाचा प्रसार रोखून जिल्हा हत्तीरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यात येत्या १० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत हत्तीरोग दुरीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र नागरिकांना आरोग्य सेवकांच्या उपस्थितीत हत्तीरोग प्रतिबंधक औषधांचे सेवन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात शुक्रवारी (ता. ६) आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे यांनी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी त्यांनी सांगितले की, मागील मोहिमेदरम्यान काही भागांमध्ये नागरिकांनी हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे सेवन न केल्यामुळे जिल्ह्यात १२ हत्तीरोग बाधित रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांमध्ये डहाणू तालुक्यातील पटेलपाडा येथे चार, तलासरी तालुक्यातील काजळी येथे पाच, वाणगाव कोमपाडा, सूत्रकार व आशाआगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये रात्रीच्या वेळी घेण्यात आलेल्या नाइट ब्लड सर्व्हेअंतर्गत २४०० रक्तनमुने तपासण्यात आले होते, त्यातून हे रुग्ण निष्पन्न झाले असून, संबंधित सर्व रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर हत्तीरोग दुरीकरणाची दुसरी फेरी तलासरी, विक्रमगड, डहाणू नगर परिषद हद्द तसेच ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवली जाणार आहे. तसेच सासवंड परिसरात औषध सेवनाचे प्रमाण फक्त ७६ टक्के असल्याने हा भाग ‘ अतिधोकादायक परिसर’ म्हणून घोषित करण्यात आला असून, येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस डॉ. अजय ठाकरे, जिल्हा हिवताप कार्यालयाचे वैभव संखे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------
चौकट
औषधाचे सेवन करण्याचे आवाहन
दरम्यान, बुलेट ट्रेन व बडोदा हायवे प्रकल्पांमध्ये कार्यरत सर्व व्यक्तींनाही हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे सेवन करण्यात येणार असून, ही मोहीम आशासेविका, एमपीडब्ल्यू, आरोग्य सहाय्यक तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. २०१५ मध्ये या मोहिमेची पहिली फेरी राबविण्यात आली होती. त्यादरम्यान जिल्ह्यात ४० नवीन हत्तीरोग बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यांना १२ दिवसांची पूर्ण उपचारपद्धती देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या जुने-नवे मिळून एकूण ६३० हत्तीरोग रुग्णांची नोंद असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे सेवन करावे. औषधांचे सेवन न केल्यास भविष्यात आजाराचा धोका वाढू शकतो, असा इशाराही आरोग्य विभागाकडून देण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.