कासा शासकीय विश्रामगृह सुरू
esakal February 08, 2026 03:46 AM

कासा शासकीय विश्रामगृह सुरू
दीर्घ प्रतीक्षेनंतर दुरुस्ती पूर्ण; एक कोटींचा निधी खर्च
कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा येथे शासकीय विश्रामगृहाची दीर्घकाळ प्रलंबित असलेली दुरुस्ती अखेर पूर्ण झाली आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेले विश्रामगृह पुन्हा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
कासा येथील शासकीय विश्रामगृह अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत बंद होते. त्यामुळे नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या कामाला गती देत सर्व सुविधा अद्ययावत केल्या असून, विश्रामगृह प्रत्यक्ष वापरात आणण्यात आले आहे. या दुरुस्ती कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे एक कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये इमारतीची संपूर्ण दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयांची सुधारणा, छताची दुरुस्ती तसेच विश्रामगृहाभोवती संरक्षक भिंत, मुख्य प्रवेशद्वार उभारले आहे.
---------------------------------
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धामणी, कवडास धरणे, विवळवेढे महालक्ष्मी मंदिर, डहाणू समुद्रकिनारा, जव्हार पर्यटन क्षेत्र, आशेरीगड, गंभीरगड तसेच दमन व शेलवास, पर्यटनस्थळे जवळ असल्याने कासा येथे शासकीय विश्रामगृहाची मोठी गरज होती.
-------------------------
मध्यवर्ती ठिकाणी असलेले शासकीय विश्रामगृह अनेक वर्षांपासून बंद होते. दुरुस्तीची मागणी होत होती. अखेर काम पूर्ण झाले, याचा आनंद आहे.
- हरेश मुकणे, उपसरपंच, कासा
---------------------------------
कासा येथील विश्रामगृहासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुरुस्तीबरोबरच आवश्यक कर्मचारी उपलब्ध आहेत.
- नितीन पगारे, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, डहाणू
----------------------------
अनेक वर्षांपासून विश्रामगृह बंद होते. आता त्याची सुधारणा करून नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे.
- राजेंद्र गावित, आमदार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.