Nashik Shiv Sena : "साहेब, आम्ही कुठे कमी पडलो?" नाशिक शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; तिदमेंचे शिंदेंना पत्र!
esakal February 08, 2026 02:45 AM

नाशिक: महापालिकेत भारतीय जनता पक्षाने सत्तेत शिवसेनेला सहभागी करून उपमहापौरपद दिल्यावर शिवसेनेतून विलास शिंदे यांची उपमहापौरपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्तीवरून पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ‘साहेब, आम्ही कुठे कमी पडलो?’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तिदमे यांनी आपल्या पत्रात संघर्षाचा संपूर्ण प्रवास मांडत म्हटले आहे, की नाशिकमध्ये कोणीही उघडपणे पुढे येत नसताना कोणतीही अट-शर्थ न ठेवता, भविष्यातील चिंता न करता सर्वप्रथम शिवसेनेत प्रवेश केला.

उबाठा गटाशी थेट संघर्ष करीत पक्षासाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. पक्षकार्याला वेळ देता यावा म्हणून नोकरीही सोडली. म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे सात वर्षे उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपद भूषविले. हा संघर्ष पदासाठी नव्हे, तर संघटना उभी करण्यासाठी होता. शिवसेनेचा काळ कठीण असतानाही निष्ठेने वाट काढली.ते म्हणाले, की शिवसेनेत पदांपेक्षा प्रामाणिक कार्याला महत्त्व असते. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे सामान्य शिवसैनिकांच्या मनात ‘आपण नेमके कुठे कमी पडलो?’ असा प्रश्न निर्माण होत आहे.

बोरस्ते व शिंदे निशाण्यावर

या पत्रातून तिदमे यांनी एकीकडे पक्षनिष्ठेचा मुद्दा मांडत, दुसरीकडे उपनेते अजय बोरस्ते आणि नवनिर्वाचित उपमहापौर विलास शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. सव्वा वर्षाच्या चर्चेनंतर पक्षात आलेल्या अजय बोरस्ते यांना जिल्हाप्रमुख, उपनेते, महामंडळ व गटनेते अशी अनेक पदे देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मूळ शिवसैनिक नसतानाही त्यांच्यावर संधींचा ‘पाऊस’ पाडण्यात आल्याचा आरोप तिदमे यांनी केला.

Yogi Adityanath: योगी पुन्हा पोहोचले आपल्या शाळेत! २ कोटींच्या आलिशान इमारतीचं केलं लोकार्पण; CM धामींच्या कामाचंही केलं कौतुक

तसेच, लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात प्रवेश केलेल्या विलास शिंदे यांना थेट संपर्कप्रमुख आणि उपमहापौरपद देण्यात आल्याचे सांगत, ‘ज्यांनी पक्ष उभा केला, संघर्ष केला, निष्ठा जपली, त्यांनाच वारंवार डावलले जाते,’ असा स्पष्ट संवाद तिदमे यांनी साधला आहे. या पत्रामुळे नाशिकमधील शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड झाली असून, आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.