युरोपीय तत्त्वचिंतनाची अभ्यासपूर्ण ओळख
esakal February 08, 2026 06:45 AM

तत्त्वज्ञान ही मानव्यविद्याशाखांमधील एक महत्त्वाची आणि सर्व विषयांना व्यापणारी विद्याशाखा आहे. विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य जिज्ञासू माणसांनाही या विषयासंबंधी जाणून घ्यायला आवडते आणि स्वतःला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्या परीने सुरू असतो. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक डॉ. दीप्ती गंगावणे यांचे प्रस्तुत पुस्तक तशा प्रयत्नांना सहाय्यभूत ठरणारे आहे.

विश्वाचे स्वरूप काय, हे जाणून घेऊ पाहणारे ‘सत्ताशास्त्र’ आणि ते ज्ञान संपादन करण्याची रीत, पद्धत; तसेच त्या बाबतीतील माणसाची मर्यादा किंवा क्षमता यांची चिकित्सा करणारे ‘ज्ञानशास्त्र’ या तत्त्वज्ञानाच्या दोन शाखांतील युरोपीय तत्त्वज्ञांच्या योगदानाची ओळख लेखिकेने करून दिली आहे. या तत्त्वज्ञांच्या नावांची यादी नुसती पाहिली तरी विषयाचा आवाका किती मोठा आहे, याची कल्पना येते. प्लेटो, सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल, ओखॅम, देकार्त, स्पिनोझा, लाइबनिट्त्स, लॉक, बर्कले, ह्यूम, कांट, हेगेल, शॉपेनहॉवर, नित्शे इत्यादी तत्त्वज्ञ या छोटेखानी पुस्तकात समाविष्ट आहेत. विषयाचा एवढा मोठा कॅन्व्हास हाती घेण्यात एक मोठा धोका होता, तो म्हणजे एक धावती झलक एवढेच पुस्तकाचे स्वरूप बनण्याचा. परंतु, तसे होऊ न होता, लेखिकेने प्रत्येक तत्त्वज्ञाच्या विचारांचे वैशिष्ट्य आणि गाभा काय, याचे सखोल आणि मर्मग्राही विवेचन केले आहे आणि तेदेखील वैचारिक इतिहासाचा ओघ सांभाळत.

हा तत्त्वविचारांचा विकास समजावून सांगताना पुस्तकाची रचना कालक्रमानुसार केली असली तरी ‘विषयसूत्र’ महत्त्वाचे मानून लेखन केले आहे. जवळजवळ अडीच हजार वर्षांचे हे विचारसंचित आहे. त्याची ओळख करून देताना त्या त्या विचारांना असलेली काळाची चौकट, त्या काळातील राजकीय-सामाजिक-धार्मिक परिस्थिती याचेही भान लेखिकेने ठेवले असल्याने या पाऊलखुणांची दिशा कळण्यास वाचकाला मदत होते. तो सगळा इतिहास उलगडत जातो. एक उदाहरण पाहूया. ओखॅमच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करुन देताना त्या लिहितात - ‘‘धर्मशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांनाच प्रामुख्याने ‘ज्ञान’ मानण्याचा काळ मागे पडून ‘विज्ञान’ हे नव्या प्रकारचे ज्ञान विकसित होण्यासाठी अनेक घटकांचे योगदान कारणीभूत झाले. धर्मशास्त्रापेक्षा तत्त्वज्ञान वेगळे झाल्यामुळे तत्त्वज्ञानाचे एक प्रकारे ऐहिकीकरण झाले. ईश्वर न नाकारताही, तो श्रद्धेचा विषय ठरवून ईश्वराची निर्मिती म्हणून विश्वाचे स्वतंत्रपणे, बुद्धिनिष्ठ आकलन करून घेण्याची शक्यता आकाराला आल्याने निसर्गाचे तत्त्वज्ञान विकसित झाले. यामधूनच आधुनिक विज्ञानाच्या इमारतीची पायाभरणी व्हायला सुरुवात झाली...’

डॉ. गंगावणे यांनी कांटचा ‘माणूस हा नैतिक कर्ता आहे,’ हा विचार समजावून देताना केलेले विवेचन मूलग्राही तर आहेच, पण वाचनीय झाले आहे. ‘जे करावेसे वाटते त्यापेक्षा जे करणे योग्य असते’ ते कर्तव्य. पण कर्तव्याची संकल्पना ही निसर्गदत्त वासना, प्रेरणांमधून निर्माण होऊ शकत नाही. ती प्रज्ञेवर आधारित असते. प्रज्ञा जेव्हा मानवी आचरणाशी निगडित होते, तेव्हा ती विवेकबुद्धी होते... नैसर्गिक प्रेरणांच्या बंधनातून मनुष्याला मुक्त करून, विवेकबुद्धी त्याला नैतिक स्वातंत्र्य बहाल करते. हा महत्त्वपूर्ण पैलू निसर्गाचीच निर्मिती असलेल्या माणसाला ‘नैतिक कर्ता’ हे स्वरूप देऊन विशेष प्रतिष्ठा मिळवून देतो...’’

प्रज्ञावाद, अनुभववाद, जर्मन चिद्वाद, मानसप्रत्ययवाद, अस्तित्ववाद अशा अनेक विचारसरणींची ओळख यानिमित्ताने होते. हे सगळे विचारसंचित महत्त्वाचे असले, तरी आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगामुळे जीवनाच्या सर्वच आयामांचे आकृतिबंधही बदलत असल्याची जाणीवही लेखिकेला आहे. त्या लिहितात - ‘‘शोभादर्शकातील एखादी रचना तिच्या लक्षवेधीपणामुळे न्याहाळून बघण्याचा प्रयत्न करीत असता क्षणभरात तिने नवीन रूप धारण करावे, असे काहीसे जीवनघटकांच्या रचनांचे होते आहे. या रचना जाणून घेताना विचारांच्या, विद्याशाखांच्या, कलांच्या आणि भाषेच्याही चौकटी अपुऱ्या पडताहेत... स्वतःलाच तपासून पाहण्याची तत्त्वज्ञानाची क्षमता जणू कसाला लागत आहे.’’ वर्तमानकाळाच्या स्पंदनांकडे दुर्लक्ष न करता नव्या आव्हानांचे स्वरूपही लेखिकेने विचारात घेतले आहे, हे विशेष. त्यासंबंधीचे विवेचन वाचकांना नक्कीच अंतर्मुख करेल.

युरोपीय तत्त्वज्ञानासारखा विषय सुबोध मराठीत किती चांगल्या प्रकारे मांडता येतो, याचा वस्तूपाठ म्हणजे या पुस्तकाचे लेखन आहे. डॉ. सदानंद मोरे यांच्या विवेचक प्रस्तावनेमुळे या पुस्तकाचे मोल आणि महत्त्व कळण्यास मदत होते. सोलीव विचारांना एक अंगभूत सौंदर्य असते, त्यासाठी भाषिक अलंकरणाची गरज नसते, याचाही प्रत्यय या पुस्तकामुळे येतो.

पुस्तकाचे नाव : युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाऊलखुणा

लेखिका : डॉ. दीप्ती गंगावणे

प्रकाशक : कलासक्त, पुणे

पृष्ठे : १८० मूल्य : २५० रु.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.