बोर्ड परीक्षा काळात अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर करू नये
शिक्षक संघटनांची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
मुलुंड, ता. ७ फेब्रुवारी (बातमीदार) : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना “अतिरिक्त” घोषित करण्याबाबतची संभाव्य यादी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यभरात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना ही यादी प्रसिद्ध करणे वेळेअयोग्य व शिक्षण व्यवस्थेस अपायकारक ठरेल, अशी भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे.
संघटनांच्या मते, या प्रक्रियेमुळे अतिरिक्त ठरविण्यात येणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव, असुरक्षितता आणि अस्थैर्य निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम प्रात्यक्षिक परीक्षा, परीक्षा पर्यवेक्षण, केंद्रांवरील जबाबदाऱ्या, उत्तरपत्रिका तपासणी तसेच गोपनीयता या महत्त्वाच्या घटकांवर होण्याची शक्यता आहे. परिणामी संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष तथा मुलुंड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विशाल कडणे यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. १३ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करू नये आणि ही प्रक्रिया जून २०२६ पर्यंत पुढे ढकलावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, मागणी न मानल्यास मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक कार्यालये तसेच पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.