जळगाव: शहर महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची शुक्रवारी (ता. ६) सकाळी अकराला अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या परिसरात महायुतीकडून जल्लोष करण्यात आला.
जानेवारीत पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ४६ जागा मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवसेनेला २२, राष्ट्रवादी काँग्रेसला १, शिवसेना (उबाठा) गटाला ५ जागा मिळाल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. महापौरपदासाठी भाजपकडून दीपमाला काळे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून मनोज चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती.
विशेष सभेचे वातावरण
आज सकाळी अकराला झालेल्या विशेष सभेला महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगर सचिव सतीश शुक्ला हे व्यासपीठावर होते तर अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्यासह अधिकारी वर्ग आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. सभेची सुरुवात ‘वंदे मातरम’ या गीताने झाली. त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महायुतीचे सर्व नगरसेवक भगवे फेटे परिधान करून सभागृहात दाखल झाले होते.
अर्ज छाननी अन् घोषणा
पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी घुगे यांनी अर्ज छाननी करून पंधरा मिनिटांचा अवधी अर्ज माघारीसाठी दिला. त्यानंतर पीठासीन अधिकारी घुगे यांनी दीपमाला काळे यांच्या नावाची महापौरपदी तर मनोज चौधरी यांच्या नावाची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर आमदार सुरेश भोळे, शिवसेना नेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी सभागृहात येत नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांचा सत्कार केला.
जल्लोषाचे वातावरण
निवड जाहीर होताच महापालिका आवारात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेच्या आवारात लोकांची मोठी गर्दी उसळली होती.
सभेतील क्षणचित्रे...
महापौर काळे सकाळी साडेदहालाच महापालिकेत दाखल.
सभा सुरू होण्यापूर्वी सदस्य व त्यांच्या कुटुंबांकडून आसनाचा शोध.
सभेला नियोजित वेळेत ठिक ११ वाजता सुरुवात.
शिवसेनेसह भाजपचे अनेक नगरसेवक उशिरा सभेला पोहोचले.
महापौर व उपमहापौर निवडीनंतर महायुतीकडून जल्लोष.
ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी.
महापौर व उपमहापौरांनी दालनात जाऊन पदभार स्वीकारला.
फुलांच्या माळांनी दालन सजविण्यात आले होते.
स्वागतासाठी पदाधिकाऱ्यांसह लोकांची गर्दी.
माहेर अन् सासरचा राजकीय वारसा..!
जळगाव : दीपमाला काळे यांचे माहेर जळगावचेच असून, सासर देखील जळगावचे आहे. माहेर व सासरकडील दोघा कुटुंबाकडून राजकीय वारसा त्यांना लाभला आहे. त्यांचे आजोबा दशरथ महाजन व आई अलका गोपाळ महाजन तसेच काका (स्व.) युवराज महाजन हे नगरसेवक होते. सासरे (स्व.) अनंत काळे हे माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष होते तसेच का. उ. कोल्हे शाळेत शिक्षक तसेच त्यांना स्काऊट गाइडचा त्यांना पुरस्कार मिळालेला होता.
पती मनोज काळे माजी नगरसेवक तर चुलत सासरे पांडुरंग काळे व सासू सुधा काळे हे दोघेही माजी नगराध्यक्ष आहेत. दीर अमित काळे हे देखील नगरसेवक आहेत. सेंट जोसेफ स्कूलमध्ये त्यांचे १० वी पर्यंत तर जी. जी. बेंडाळे महिला महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण त्यांचे झाले. २०१३ पासून दीपमाला काळे या राजकारणात सक्रिय आहेत. लहानपणापासून व्यवसायात असलेली आवड ते आज ही पती मनोज काळे यांचा ते व्यवसायात सांभाळात आहे. त्याच सोबत पर्यावरण, फिटनेस विषयी त्यांची देखील आवड आहे. दोन मुले असून, मोठा मुलगा एमबीएला तर मुलगी पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे.
DK Shivakumar Latest News : डीके शिवकुमार मुख्यमंत्री कधी? सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले...सभेला शिवसेना, भाजपचे सदस्य उशिरा
सभेच्या सुरुवातीला सभागृहात भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिळून २२ सदस्य उपस्थित होते. ‘वंदे मातरम् गीत व अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर चार ते पाच मिनिटांनी शिवसेना, भाजपचे सदस्य सभागृहात पोहोचले. त्यामुळे पहिल्याच सभेत शिवसेना तसेच भाजपचे अनेक नगरसेवक उशिरा सभागृहात आल्याचे चित्र दिसून आले.
नागरिकांनी दिलेल्या संधीचे तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या संधीचे नक्की सोने करून दाखवू. जळगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास असून, विकास पुस्तिकेनुसार शहराचा तसेच शहरातील सर्व प्रभागांचा आम्ही विकास करण्यास कटिबद्ध आहोत.
- मनोज चौधरी, उपमहापौर, जळगाव महापालिका