T20 World Cup, IND vs USA: संजू सॅमसनला वगळलं, बुमराहचाही समावेश नाही; सिराजचे पुनरागमन; कशी आहे भारताची प्लेइंग इलेव्हन
esakal February 08, 2026 06:45 AM

T20 WC, India vs USA, Playing XI: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा शनिवारी (७ फेब्रुवारी) श्रीगणेशा झाला. पहिल्याच दिवशी यजमान भारतीय संघही स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यास सज्ज आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

या सामन्यासाठी अमेरिकेचा संघाने नाणेफेक (Toss) जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.

Rohit Sharma: इतिहास बदलण्याची वेळ आलीय! T20 वर्ल्ड कपपूर्वी 'हिटमॅन' टीम इंडियाबद्दल काय म्हणाला? वाचा

या सामन्यासाठी भारतीय संघात (Team India) मोठे बदल झाले आहेत. हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर झाल्याने त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे. आता त्याला अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्येही (Playing XI) संधी मिळाली आहे.

तो १८ महिन्यांनंतर भारतीय संघाकडून टी२० सामना खेळताना दिसणार आहे. त्याला जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागेवर संधी मिळाली आहे. बुमराह अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी आजारी पडल्याने उपलब्ध नाही, याबाबत नाणेफेकीवेळी सूर्यकुमार यादवने माहिती दिली.

याशिवाय संजू सॅमसनलाही (Sanju Samson) प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे इशान किशन अभिषेक शर्मासोबत फलंदाजी करणार हे निश्चित झाले आहे. तर तिलक वर्माचे (Tilak Varma) भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. वॉशिंग्टन सुंदरही अद्याप पूर्ण तंदुरुस्त नसल्याने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही.

T20 World Cup: सर्वाधिक धावा, शतकं अन् विकेट्स.... कोणाच्या नावावर कोणता विक्रम? पाहा संपूर्ण लिस्ट

अमेरिका संघातही ९ भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय वातावरणाची माहिती आहे. अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलही भारतीय वंशाचा आहे. अमेरिकेने या सामन्यासाठी ६ फलंदाज, २ अष्टपैलू आणि ३ गोलंदाज असे कॉम्बिनेशन प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आहे.

प्लेइंग इलेव्हन -

भारत - इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

अमेरिका - अँड्रिज गॉस (यष्टीरक्षर), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (कर्णधार), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्क्विक, अली खान, सौरभ नेत्रावळकर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.