मुलांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलिस-बाल संरक्षण यंत्रणेची संयुक्त बैठक!
हरवलेल्या मुलांच्या तातडीने शोधासाठी ‘आकृती आराखडा’ तयार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : रेल्वे स्थानक परिसरातून हरवणाऱ्या मुलांचा तातडीने शोध घेणे आणि बालतस्करीला प्रतिबंध घालणे या उद्देशाने मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयात विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले. लोहमार्ग पोलिस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय (मुंबई शहर) तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत कार्यरत शासकीय यंत्रणा आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चाइल्ड हेल्पलाइन (१०९८) मुंबई शहरचे प्रकल्प समन्वयक नितीन दिक्षित, ठाणे जिल्हा चाइल्ड हेल्पलाइनच्या श्रद्धा नारकर आणि मुंबई उपनगर चाइल्ड हेल्पलाइनचे सुपरवायझर दुर्गेश सोळंकी यांनी आपापल्या कार्याचा आढावा सादर केला.
हरवलेल्या मुलांचा शोध अधिक जलद आणि परिणामकारक व्हावा यासाठी बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ‘मिशन वात्सल्य’ पोर्टलवर हरवलेल्या मुलांची माहिती तातडीने अपलोड करण्यावर भर देण्यात आला. मूल हरवल्यानंतरच्या पहिल्या काही तासांना ‘गोल्डन अवर्स’ मानून त्या काळात रेल्वे व बस स्थानकांवर विशेष शोधमोहीम राबविण्यासाठी स्वतंत्र ‘आकृती आराखडा’ तयार करण्यात आला. तसेच पोलिस आणि संबंधित संस्थांमध्ये समन्वय अधिक बळकट करण्यासाठी व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातून माहितीची जलद देवाणघेवाण करून पालकांचा शोध घेण्याचे ठरविण्यात आले.
या वेळी ‘प्रथम’ संस्थेचे प्रतिनिधी नवनाथ कांबळे, रेल्वे चिल्ड्रन्स इंडियाचे फरदीन खान व प्रियांका सकपाळ, तसेच बीटीडब्लू प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रतिनिधी व फॉरेन्सिक सायकॉलॉजिस्ट पूनम नलावडे यांनी बाल संरक्षण आणि शोध प्रक्रियेबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.
अधिक सतर्क राहण्याचे आवाहन
रेल्वे स्थानकांवरील गर्दीचा गैरफायदा घेत बालतस्करीचे प्रकार घडू नयेत, यासाठी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिस अधिकारी मालवणकर यांनी केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही समन्वय यंत्रणा पुढे अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.