तुर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प
esakal February 08, 2026 06:45 AM

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : तुर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाली आहे. परिणामी शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर घरगुती व औद्योगिक कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे हे नवी मुंबई महापालिकेसमोर मोठे आव्हान ठरत होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईसाठी स्वतंत्र आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प असावा, असा ध्यास घेत पाठपुरावा सुरू ठेवला होता. या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर करून तुर्भे येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत नगरविकास विभागाचे अवर मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना यासंदर्भात आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार भराटे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना प्रकल्पासंबंधी सविस्तर प्रस्ताव, स्वयंस्पष्ट अभिप्राय आणि आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे आदेश दिले. अखेर नवी मुंबईतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापन व विल्हेवाटीसाठी एकात्मिक प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यासाठी खासगी कंपनीला पत्र देण्यात आले. या प्रकल्पासाठी अंदाजे १८०० ते २००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हा प्रकल्प केवळ कचऱ्याच्या विल्हेवाटीपुरता मर्यादित नसून, नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कचऱ्यामुळे होणारे वायू व दुर्गंधी प्रदूषण कमी होईल, तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने वीजनिर्मिती होऊन स्मार्ट सिटी संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त होईल.
- मंदा म्हात्रे, आमदार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.