टेनिसच्या क्षितिजावर एलेना एक नाव!
esakal February 08, 2026 09:45 AM

- जयेंद्र लोंढे, jayendra.londhe@esakal.com

रशियातील मॉस्को येथे जन्मलेली अन् व्यावसायिक टेनिस कझाकस्तानकडून खेळणारी एलेना रिबकीनाने मागील शनिवारी अव्वल मानांकित अरीना सबलेंकाला तीन सेटमध्ये पराभूत करीत ऑस्ट्रेलियन ओपन या २०२६मधील पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. एलेनाच्या कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद होय. याच पार्श्वभूमीवर तिच्या कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप.

एलेना रिबकीनाचा जन्म १९९९मध्ये मॉस्को येथे झाला. मोठी बहीण अॅना हिच्यामुळे एलेनाही लहानपणीच खेळांकडे वळू लागली. जिम्नॅस्टीक्स व आईस स्केटिंग यांसारखे खेळ ती खेळू लागली; मात्र तिची उंची अधिक असल्यामुळे या दोन्ही खेळांमध्ये व्यावसायिक कारकीर्द घडू शकत नाही, असा सल्ला देण्यात आल्यानंतर तिने या दोन्ही खेळांमधून माघार घेतली. तसेच वडिलांच्या सल्ल्यानुसार टेनिस या खेळामध्ये पाऊल टाकले. या वेळी तिचे वय होते सहा वर्षे.

एलेनाचा टेनिस या खेळातील प्रवास लहान वयामध्ये सुरू झाला; पण तिला अभ्यास व खेळ याची योग्य सांगड घालावी लागत होती. यासाठी तारेवरची कसरतही करावी लागली. कारण ती ज्या शाळेमधून शिकत होती, त्या शाळेमध्ये शिक्षणालाही तेवढेच महत्त्व होते. फक्त खेळांसाठीची ती शाळा नव्हती.

यामुळे एलेना फक्त दिवसाला दोन तास टेनिसचा सराव करीत असे. एवढेच नव्हे तर टेनिस या खेळामध्ये प्रगती करण्यासाठी वैयक्तिक सरावाची अत्यंत गरज असते. एलेनाला वैयक्तिक सराव ज्युनियर स्तरापासून मिळायला लागला. त्याआधी आठ किंवा चार जणांच्या ग्रुपमध्ये तिला टेनिसचा सराव करावा लागत होता.

वयाच्या १५व्या वर्षांपासून एलेनाच्या ज्युनियर व व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. या टप्प्यामध्ये तिला मोठी झेप घेता आली नाही; पण तिने टेनिसमधील कारकीर्द कायम ठेवताना पुढे जाण्याचा प्रयत्न केला. २०१८मध्ये एक क्षण असा आला, की तिला आपले राष्ट्रीयत्व बदलावे लागले. कझाकस्तान टेनिस संघटनेकडून तिला आपले राष्ट्रीयत्व बदलण्याचा सल्ला दिला.

याबदल्यात त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य तिला देण्यात आले. याच दरम्यान तिच्याकडे अमेरिकेतील कॉलेजमध्ये टेनिस खेळण्याचा पर्याय उपलब्ध होता. एलेना मात्र कझाकस्तान टेनिस संघटनेकडून आलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. तिथून ती आतापर्यंत कझाकस्तानच्या झेंड्याखाली टेनिसची कारकीर्द फुलवत आहे.

एलेनाने २०२०मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तिने या वर्षी पाच डब्ल्यूटीए स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. शेनझेन ओपन, सेंट पीटर्सबर्ग ट्रॉफी, दुबई चॅम्पियनशिप, इंटरनेशनॉक्स स्ट्रासबोर्ग आणि होबार्ट इंटरनॅशनल या पाच स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करताना तिने दमदार खेळाचा नजराणा पेश केला.

तिला होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जेतेपद पटकावता आले. इतर चारही स्पर्धांमध्ये एलेनाला उपविजेतेपद मिळाले; मात्र कोरोनाच्या काळात पाच महिन्यांसाठी स्पर्धा बंद असतानाही तिने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली, हे विशेष.

२०२१ मध्ये एलेनाच्या ग्रँडस्लॅममधील कारकिर्दीला सर्वार्थाने सुरुवात झाली, असे म्हणता येईल. तिने फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला. या स्पर्धेमध्ये तिने चौथ्या फेरीत अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला पराभूत केले.

या स्पर्धेच्या दुहेरीतही तिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. ज्या खेळाडूसह ती दुहेरीत एकत्रित खेळत होती, त्याच खेळाडूने एकेरीमध्ये एलेनाला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले. अनास्तासिया पावलीचेनकोवा हिने एलेनाचा एकेरीतील खेळ खल्लास केला.

फ्रेंच ओपन स्पर्धेत तिला आगेकूच करता आली नसली तरी पुढल्या वर्षी अर्थातच २०२२मध्ये एलेनाने आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद अगदी रुबाबात पटकावले. तिने हिरव्या गवतावर खेळल्या जात असलेल्या विम्बल्डन या ग्रँडस्लॅमचा झळाळता करंडक आपल्याकडे खेचून आणला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तिने ओन्स जॅब्यूएर हिला पराभूत केले.

२०२३ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचून एलेनाने आपल्या अंगभूत कौशल्याची झलक दाखवली; पण जेतेपदाच्या लढतीत पहिला सेट जिंकल्यानंतरही एलेनाला अरीना सबलेंकाकडून हार पत्करावी लागली. दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद थोडक्यात हुकले.

एलेना हिने २०२३ ऑस्ट्रेलियन ओपन या ग्रँडस्लॅममधील अंतिम फेरीत झालेल्या पराभवाची परतफेड या वर्षी अर्थातच २०२६मध्ये केली. तिने सबलेंका हिला तीन सेटमध्ये नमवताना पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदावरही हक्क सांगितला.

या लढतीतील पहिल्या सेटमध्ये एलेनाने सुरुवातीलाच सबलेंकाची सर्व्हिस मोडून काढली आणि वर्चस्व गाजवले. जबरदस्त फोरहँड, बेसलाइनच्या अफलातून खेळाच्या जोरावर तिने बाजी मारली. रॅलीच्या खेळातही ती सरस ठरली. दुसऱ्या सेटमध्ये सबलेंकाने शानदार सर्व्हिसच्या जोरावर एलेनाला बॅकफूटवर ढकलले.

निर्णायक सेटमध्ये सबलेंकाने सुरुवातीलाच ३-० अशी आघाडी मिळवत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. एलेनाने यानंतर झोकात पुनरागमन करताना ३-३ अशी बरोबरी केली. अखेरच्या सहापैकी पाच गेममध्ये विजय मिळवत तिने प्रतिष्ठेची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. एलेनाने मागील वर्षीही डब्ल्यूटीए फायनल्समध्ये सबलेंकावर मात करीत जेतेपद पटकावले होते.

एलेनाचा आणखी एक स्वभाव गुण ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदानंतर दिसला. इतर खेळाडू जेतेपदाचा जल्लोष आक्रमकपणे करत असतानाच एलेना मात्र विजयाचा आनंद अगदी साधेपणाने करताना दिसली. तिचे पाय जमिनीवर असल्याचे हे उत्तम उदाहरण होते. एलेनाने मागील काही महिन्यांमध्ये टेनिसविश्वात अनेक विक्रमांची नोंद केली आहे.

एकाच ग्रँडस्लॅममध्ये पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडूंना पराभूत करणारी ती चौथी टेनिसपटू ठरली आहे. तसेच अशीच कामगिरी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा करणारी ती पुन्हा चौथी खेळाडू ठरली आहे. अव्वल १० क्रमांकावरील खेळाडूंना सलग दहा सामन्यांमध्ये पराभूत करणारी ती इगा स्विअतेकनंतरची दुसरी टेनिसपटू होय. मागील २१ पैकी २० सामन्यांमध्ये एलेनाने विजयाला गवसणी घालताना देदीप्यमान खेळ करून दाखवला आहे.

एलेनाने टेनिसच्या क्षितिजावर चमकायला सुरुवात केली आहे. पॉवरफुल्ल सर्व्हिस, बेसलाइनवरील आक्रमक खेळ, ग्राउंडस्ट्रोकमधील धडाकेबाज खेळ, एसेस मारण्याची कला आणि जगातील कोणत्याही खेळाडूला पराभूत करण्याचा विश्वास या सर्व गुणांमुळे एलेना टेनिसमधील अव्वल दर्जाची खेळाडू म्हणून नावारूपाला येत आहे.

सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या या टेनिसपटूने लवकरच पहिल्या स्थानावर झेप घ्यावी, असे मनापासून वाटते. तसेच फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन या दोन ग्रँडस्लॅमसोबत ऑलिंपिक सुवर्णपदकावर नाव कोरावे, असे या वेळी म्हणावेसे वाटते.

आठवड्यात क्रीडांगणावर...

टी-२० विश्वकरंडकाचा थरार सुरूच राहणार...

७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या टी-२० विश्वकरंडकाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. या आठवड्यात तीन लढती मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहेत. यामध्ये इंग्लंड-वेस्ट इंडीज, इटली-नेपाळ, वेस्ट इंडीज-नेपाळ या लढतींचा समावेश आहे.

आशियाई नेमबाजीत खेळाडूंचा कस

आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा २ फेब्रुवारीपासून नवी दिल्लीमध्ये सुरू असून या स्पर्धेमध्ये भारतासह परदेशी खेळाडूंचा कस लागत आहे. डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये २० देशांतील ३११ नेमबाज ३० पदकांसाठी लढत आहेत. यजमान भारताच्या सर्वाधिक ११८ खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेला लाभला आहे. ही स्पर्धा १४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

रणजी करंडकाच्या उपांत्य लढतींना सुरुवात

भारतातील अत्यंत मानाची समजली जाणारी रणजी स्पर्धा ही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान चार उपांत्यपूर्व फेरीच्या लढती आटोपणार आहेत. जमशेदपूर, इंदूर, कल्याणी (कोलकाता) व मुंबई येथे या लढती होत आहेत. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून दोन उपांत्य फेरीच्या लढती रंगणार आहेत. या दोन लढतींमधून जेतेपदासाठीचे दोन संघ निश्चित होतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.