22751
कलमठ : येथील मतदान केंद्रांवर मतदारांनी दुपारपासून मोठी गर्दी केली होती.
22753
कलमठ : येथील मतदान केंद्रावर ८० वर्षांच्या आजींनीही मतदानाचा हक्क बजावला.
कणकवलीत दुपारनंतर मतदानाचा जोर
फोंडाघाट, नाटळमध्ये चुरस; तणावाचे वातावरण, कडक बंदोबस्त
कणकवली, ता. ७ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत मतदारांची गर्दी कमी होती, तर अकरा वाजल्यानंतर मतदारांचा ओघ वाढला आणि सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. तालुक्यात दुपारी दीडपर्यंत सरासरी ४२ टक्के मतदान झाले होते, तर साडेतीन वाजेपर्यंत ५०.३७ टक्के एवढे मतदान झाले होते.
फोंडाघाट जिल्हा परिषद गणामध्ये सर्वाधिक चुरशीची लढत आहे. तिरंगी सामना असल्याने तिन्ही उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे या गणामध्ये चुरशीने मतदान होत असल्याचे चित्र होते, तर नाटळ जिल्हा परिषद मतदारंघाची निवडणूकही भाजपकडून प्रतिष्ठेची केली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप आणि शिवसेना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादंग, हाणामारीच्याही घटना घडल्या होत्या. त्यानंतर येथे शांतता आहे; मात्र आपल्या उमेदवारालाच यश मिळावे, यासाठी कार्यकर्ते मेहनत घेत असल्याने नाटळ गणातील गावांमध्येही चुरशीने मतदान होत असल्याचे दिसून आले.
सकाळच्या सत्रात वरवडे फणसनगर येथील प्राथमिक शाळेत पालकमंत्री नीतेश राणे आणि त्यानंतर काही वेळाने आमदार नीलेश राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला, तर कलमठ कुंभारवाडी येथील सखी मतदान केंद्राला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भेट देऊन पाहणी केली. तालुक्यात नाटळ जिल्हा परिषद गणामध्ये येथे राजकीय वादंग होण्याची शक्यता असल्याने तेथील काही मतदान केंद्रांवर जादा पोलिस बंदोबस्त तैनात होता. तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ११.८ टक्के मतदान झाले. दुपारी साडेअकरापर्यंत २७.६१ टक्के मतदान झाले. दुपारी दीडपर्यंत ४१ टक्के, तर साडेतीनपर्यंत ५०.३७ टक्के मतदान झाले.
--
सखी मतदान केंद्र लक्षवेधी
कुंभारवाडी येथील शाळेमध्ये सखी मतदान केंद्र उभारले होते. या केंद्रातील सर्व कामकाज महिलांनी पाहिले. या केंद्राला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भेट देऊन मतदारांसह कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे व इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.