बारामती तालुक्यात मतदार यादीत घोळ
esakal February 08, 2026 09:45 AM

माळेगाव, ता. ७ : बारामती तालुक्यातील पणदरे-मुढाळे जिल्हा परिषद गटात मतदार यादीतील घोळामुळे अनेक मतदारांची मोठी गैरसोय झाली. काही मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर गेल्याने संभ्रम निर्माण झाला, तर नीरावागज गटातील पाहुणेवाडी गावात प्रभाग क्रमांक एकमधील सुमारे ६०० मतदारांची नावेच यादीत नसल्याने त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. या प्रकारामुळे मतदारांमध्ये आज तीव्र नाराजी पसरल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे माळेगाव नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आधीच मतदान केलेल्या चव्हाण वस्तीतील सुमारे २०० मतदारांना पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचे चित्र दिसून आले. या भोंगळ कारभारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला. पाहुणेवाडीचे रहिवासी व जिल्हा बँकेचे संचालक रणजित तावरे, बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष सतीश तावरे (रा. पाहुणेवाडी), राजेंद्र जगताप (रा. पणदरे) आदींनी मतदार याद्यांतील गोंधळाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आधीच मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून येत नव्हता. त्यातच मतदार याद्यांचा प्रश्न पुढे आल्याने मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला. परिणामी दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी केवळ ३५ ते ४० टक्क्यापर्यंतच पोहोचली होती. ही एकूण परिस्थिती लक्षात घेता, झालेले मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘घड्याळ’ की भारतीय जनता पार्टीचे ‘कमळ’ यापैकी कोणाच्या पारड्यात अधिक पडणार, याबाबत परिसरात उत्सुकता आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मतदानाची टक्केवारी घटलेली आहे, असे असले तरी झालेल्या मतदानापैकी ७५ ते ८० टक्के मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हाला झालेले आहे. वास्तविक आमचे नेते दिवंगत अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे मतदारांमध्ये प्रचंड शोक आहे. अर्थात ही दुःखद घटना पवार कुटुंबीयांच्या घरात जशी घडली, तशीच आमच्या घरामध्येही घडल्याचे आम्ही मानतो, अशा शोक भावनेतून अनेक मतदार घराबाहेर पडले नाहीत.
- संदीप बांदल, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बारामती तालुका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.