येवला: ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्याच्या आवर्षणप्रवण पूर्व भागाला वर्षागणिक पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. या वर्षी धो-धो पाऊस पडूनही खरीप हंगामातील पिके अक्षरशः शेतातच सडली. पावसाळा संपून तीन महिने उलटत नाही तोच विहिरी, कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. जास्त पावसामुळे मोठ्या प्रमाणात बागायत घेतलेल्या शेतकऱ्यांना आता पिके वाचविण्याची कसरत करावी लागत असून, शेतातील पिके जगण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येत आहे.
पावसाळ्यात धो- धो पावसामुळे जमिनींना उपळ आला, विहिरी तुडुंब भरल्या, परिणामी यंदा उन्हाळ्यापर्यत पुरेसे पाणी राहील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची पिके घेतली आहे. पण पंधरा दिवसांपासून राजापूरसह पूर्व भागात अचानक विहिरी कोरड्या पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. किंबहुना काही शेतकऱ्यांना शेतात उभे असलेले कांद्याचे पीक जगवण्यासाठी तीन ते चार हजार रुपये दराने टँकर विकत घेऊन पाणी देण्याची वेळ आली आहे.
ब्रिटिशकाळीन दुष्काळी असलेल्या तालुक्याच्या पूर्व भाग अवर्षणप्रवण असून डोंगरी भाग असल्याने कितीही पाऊस झाला तरी पाण्याची साठवण क्षमता नसल्याने सर्व पाणी उताराच्या दिशेने वाहून जाते. परिणामी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये येथे टंचाई डोके वर काढते. यामुळेच या भागात आठमाही शेती करणेही अवघड होत आहे. यावर्षी तर पावसाळ्यात धोधो पाऊस पडल्याने पंधरा दिवसापेक्षा अधिक कालावधीत पिके पाण्यात उभी होती.
बंधारे- विहिरी तुडुंब भरल्याने फेब्रुवारी, मार्चपर्यंत पाणी पुरेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र दिवाळीनंतर वाढत्या उन्हासोबत पिकांना पाण्याची गरज भासू लागली आणि उपसा सुरू होताच महिन्यापासून अचानक विहिरींनी तळ गाठला. आजमितीस तर अनेक विहिरी कोरड्याठाक झाल्याने शेतकऱ्यांना आता काही क्षेत्रातील पीक सोडून देण्याची वेळ आली आहे.
या भागाला कुठल्याही सिंचनाची सुविधा नसल्याने निसर्गाच्या भरवशावरच शेतीचे भवितव्य अवलंबून असते. दरवर्षी कितीही पाऊस झाला तरी जानेवारीमध्येच विहिरी तळ गाठतात. परिणामी शेतकऱ्यांनी आशावादावर राहून लागवड केलेला लाल रांगडा कांदा व गहू पीक धोक्यात सापडले आहे. शेवटी एक- दोन पाण्यात कांदे येतील या आशावादावर राहून शेतकरी टॅंकरने विकत पाणी टाकून पिकांना जीवदान देत आहे.
शेतकऱ्यांना कांदा पीक वाचवण्यासाठी २५ हजार लिटर टॅंकरचे पाणी विकत घेत आहेत. कांदा पिकासाठी आतापर्यंत एका एकासाठी ५० ते ७० हजार रुपये खर्च झालेला असताना पुन्हा पाणी कमी पडले आहे. टॅंकरने पाणी विकत घेऊन शेतकऱ्यांना पीक वाचवण्याची धडपड सध्या शेतकऱ्यांवर आली असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी रेल्वेची 'बुलेट' गती! ३ कोटी भाविकांच्या गर्दीसाठी नाशिक रोडसह ५ स्थानकांचा कायापालटयेवल्यातील पूर्व भाग हा सर्वात उंचावर भाग असून दरवर्षी कितीही पाणी पाऊस झाला तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच विहिरीतळ गाठतात. सिंचन सुविधा नसल्याने पीक एक- दोन पाण्यावरून हातचे जात असल्याने शेतकरी तीन ते साडेतीन हजार रुपयांचा टॅंकरने पाणी विकत घेऊन टाकत आहे. पीक वाचवण्यासाठी प्रयत्न केले जाते आहे.
- माउली काळे, टँकरमालक, ममदापूर
कितीही पाऊस पडला तरी राजापूरसह परिसरात जानेवारीतच वहिरीनी तळ गाठला आहे. कांद्याला सध्या हजार रुपयांपेक्षा कमी दर मिळत असला तरी आशावादाने राहून पिके जगवण्यासाठी पाणी विकत घेण्याचा जुगार खेळला जात आहे. यावर्षी अगोदर निसर्गाच्या प्रकोपाने आणि आता टंचाईने शेती आर्थिक संकटात सापडली आहे. शेतमालाला योग्य भावही नसल्याने शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न आहे.
- प्रकाश वाघ, शेतकरी, राजापूर