''डिलिव्हरी हब''मधून आयफोन्सची चोरी
esakal February 08, 2026 11:45 AM

डिलिव्हरी हबमध्ये ५५ लाखांची चोरी
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : नामांकित लॉजिस्टिक कंपन्यांमध्ये तब्बल ५५ लाख पाच हजार १२६ रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महागडे मोबाईल चोरण्यासह कंपनीच्या रोख रकमेचा अपहार करणाऱ्या एकूण आठ आरोपींविरुद्ध अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण-कर्जत महामार्गावरील ऑर्डनन्स फॅक्टरीसमोरील ‘इन्स्टाकार्ट एव्हीरोरा प्रा. लिमिटेड’ या हबमध्ये १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ही चोरी झाली. यात ३१ लाख १८ हजार १२० रुपये किमतीचे ५७ मोबाईल (१८ नग २५६ जीबी आणि ३९ नग १२८ जीबी) चोरीला गेले. यातील प्रमुख आरोपी खान अटनान मोहम्मट नौशाद, शेख सुलतान अहमद, मसीउल्लाह, रवींद्र आणि त्यांच्या साथीदारांनी हबमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळवून नेला.
दुसऱ्या घटनेत कर्मचाऱ्यांनी २३ लाखांचा अपहार केला विमको नाका परिसरातील ‘अंबरनाथ डिलिव्हरी हब’मध्ये कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांनीच कंपनीला गंडा घातला. आरोपी गौस अहमद शहा, अभय पाल, विजय होवाळे आणि अली अन्सारी यांनी ग्राहकांकडून आलेली रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण २३ लाख ८७ हजार सहा रुपयांचा अपहार १ मार्च ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आला. या आरोपींनी हुशारीने सीसीटीव्ही यंत्रणा स्वतःच्या मोबाईलला लिंक केली होती आणि नंतर रेकॉर्डिंग यंत्रणाही चोरून नेली. जिल्हा अधिकारी माणिक आसाराम बाखरे यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इतक्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.