Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालवलेल्या कारमुळे भीषण अपघात (Mumbai Accident News) झाल्याची घटना समोर आली आहे. विद्याविहार येथील सोमय्या कॉलेज गेट क्रमांक 3 समोर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने किया सेलटास कार चालवत स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात बाईकस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात 5 फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडला. अपघातग्रस्त पती-पत्नींची नावे धुरमिल पटेल आणि मिनल पटेल अशी असून, दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती अद्याप चिंताजनक असून पत्नीला गंभीर स्वरूपाची अंतर्गत इजा झाल्याची माहिती समोर येत आहे.
अपघातास कारणीभूत ठरलेला चालक अल्पवयीन असून त्याचे वय अवघे 17 वर्षे आहे. संबंधित कार ही किया सेलटास असून, ती अत्यंत वेगात चालवली जात होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचे मालक तथा आरोपी वडिलांचे नाव वालजी राजा भूषण असे आहे. अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यासाठी कार देणे आणि त्यातून झालेला अपघात याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, अपघाताचा नेमका वेग, निष्काळजीपणा आणि इतर बाबींचा सखोल तपास केला जात आहे. अल्पवयीनांकडून वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असल्याने, या घटनेमुळे पालकांच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या