अमेरिकेचा टीम इंडियाविरुद्ध पराभव; डोनाल्ड टॅम्प यांचा USA संघाला थेटे मेसेज, म्हणाले…
Marathi February 09, 2026 02:25 PM

T20 विश्वचषक 2026 डोनाल्ड ट्रम्प : टी-20 विश्वचषक 2026 चा थरार अखेर सुरू झाला असून भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या भव्य स्पर्धेचे यजमान आहेत. यंदाच्या विश्वचषकात संयुक्त राज्य अमेरिकेचा संघही सहभागी झाला असून क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेत आहे. शनिवारी टीम इंडियाने आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने केला. या सामन्यात पाहुण्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या शुभेच्छा

दरम्यान, USA क्रिकेट संघाला थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्याने हा सामना अधिक चर्चेत आला. रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, “मला आत्ताच कळले की भारतात क्रिकेट विश्वचषक सुरू झाला आहे. टीम USA ला मनापासून शुभेच्छा. आमचा संघ खूप मजबूत आहे. संपूर्ण अमेरिका तुमच्या पाठीशी आहे.”राष्ट्राध्यक्षांच्या या प्रतिक्रियेमुळे USA संघाचं मनोबल नक्कीच उंचावलं.

सूर्याकुमारच्या दमदार खेळीने USA पस्त

टी-20 विश्वचषक 2026 मधील पहिल्याच सामन्यात USA ने भारताला कडवी झुंज दिली. मात्र अनुभव, संयम आणि दर्जेदार कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्ले मध्येच भारताने अवघ्या 46 धावांत चार विकेट्स गमावल्या. अभिषेक शर्मा खाते न उघडताच माघारी परतला, तर USA च्या गोलंदाजांनी नव्या चेंडूने जबरदस्त दबाव निर्माण केला.

अशा अडचणीच्या क्षणी कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी जबाबदारी स्वीकारत अफलातून खेळी केली. सूर्यकुमार याने 49 चेंडूत नाबाद 84 धावा ठोकल्या. त्यांच्या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार सामील होते. या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने 9 विकेट्स गमावत 161 धावा उभारल्या. कर्णधार म्हणून ही सूर्यकुमार यादव यांची पाचवी टी-20 डावातील खेळी असून त्यातील चौथं अर्धशतक ठरलं. USA कडून शॅडली व्हॅन शाल्कवाइक यांनी 4 विकेट्स घेत भारताला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र अमेरिकन संघ भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकला नाही. USA संघ 8 विकेट्स गमावत 132 धावांपर्यंतच मजल मारू शकला. मोहम्मद सिराज याने 3 विकेट्स घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हे ही वाचा –

ENG vs NEP : नेपाळने शेवटपर्यंत इंग्रजांना नाचवलं, 6 चेंडूत हव्या होत्या 10 धावा, टी-20 वर्ल्ड कपचा सर्वात धक्कादायक उलटफेर टळला

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.