नवी मुंबईत पोलिसांच्या जागा 527; अर्ज 50 हजार; बुधवारपासून मैदानी चाचणी
Marathi February 09, 2026 03:26 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई पोलीस दलातील शिपाई भरतीवर राज्यभरातून उमेदवारांच्या उड्या पडल्या आहेत. ५२७ शिपयांची पदे रिक्त असून त्यासाठी ५० हजार ४६० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेत उमेदवारांना ५० गुणांची मैदानी चाचणी तर १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी येत्या ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात होणार आहे. या चाचणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे.

नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई, बॅण्डमन आणि पोलीस शिपाईचालक यांची सुमारे ५२७ रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्यासाठी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर या रिक्त पदांवर अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला. पोलीस शिपायांच्या रिक्त असलेल्या ४४३ पदांसाठी १२ हजार २८४ तरुणांनी तर ३ हजार ३१ तरुणींनी अर्ज केले आहेत. माजी सैनिकांचे २०९ आणि तृतियपंथीयांचा एक अर्जही याच पदासाठी आला आहे. बॅण्डसमनची सहा पदे रिक्त आहेत. या पदांसाठी ५७३ तरुण, १४४ तरुणी आणि ३ माजी सैनिकांनी अर्ज केले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शिपाईचालकांची ८२ पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीवर अर्जाचा पाऊस पडला आहे. पोलीस चालक शिपाई पदाकरिता २८ हजार १५२ तरुणांनी, ५ हजार ४३७ तरुणींनी आणि ६२६ माजी सैनिकांनी ऑन लाईन अर्ज दाखल केले आहेत.

शिपाई भरतीसाठी राज्यभरातून येणाऱ्या उमेदवरांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. या तरुणांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस भरतीच्या ठिकाणी पनवेल महापालिकेच्या मदतीने साफसफाई ठेवण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान मुख्यालयात वैद्यकीय पथकही तैनात ठेवले जाणार आहे.

प्रक्रिया पारदर्शक होणार

नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांची भरती ही पारदर्शक वातावरणात होणार आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना जर काही संशयास्पद प्रकार आढळून आला तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावा. पोलीस महासंचालक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. भरती प्रक्रियेमध्ये जर कुणी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.