रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा झंझावात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला आहे. २०१७ च्या निवडणुकीत २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) यंदा पूर्णपणे सुपडा साफ झाला असून, पक्षाला साधे खातेही उघडता आलेले नाही.
महाविकास आघाडीच्या (मविआ) उमेदवारांना अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आहे. जिल्हाभरात मतदारांनी महायुतीला कौल दिल्याचे चित्र निकालातून स्पष्ट होत आहे. विशेषतः पनवेल आणि अलिबाग या महत्त्वाच्या मतदारसंघांतील निकालांनी राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत.
पनवेलमध्ये भाजपने दमदार कामगिरी करत सर्वच्या सर्व आठ जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे भाजपचा प्रभाव या भागात अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे, शेतकरी कामगार पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अलिबाग आणि पनवेलमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही मतदारसंघांत शेकापला एकही जागा जिंकता आली नाही. २०१७ च्या निवडणुकीत सर्वाधिक २३ जागा जिंकणाऱ्या शेकापला यंदा खातेही उघडता आले नसल्याने हा पक्षासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. अलिबागमध्ये शिवसेनेने प्रभावी कामगिरी करत सात पैकी सहा जागांवर विजय मिळवला. उर्वरित एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित नाईक यांनी जिंकली. या निकालामुळे अलिबागमध्ये शिवसेनेची ताकद अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उरण तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीने लाज राखत तीन गटांत विजय मिळवला. दक्षिण रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळाली. या संघर्षात शिवसेनेने आघाडी घेत राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रातही प्रवेश केला आहे. रोहा पंचायत समितीमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच आपले अस्तित्व निर्माण केले. तसेच महाड आणि माणगावमध्येही शिवसेनेने मुसंडी मारत महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला. शेवटचे निकाल हाती येईपर्यंत भाजपने १३ जागांवर विजय मिळवला असून, शिवसेनेने १५ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित जागांवरील चित्र स्पष्ट होत असताना महायुतीची आघाडी ठळकपणे दिसून येत आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा झंझावात कायम राहिला असून, मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदान केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पुढील काळात या निकालांचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर उमटण्याची चिन्हे आहेत.