केवळ एक सदस्य जास्त असलेल्या महायुतीची पावले सत्तास्थापनेकडे, पण सांगलीत संजयकाका ठरणार 'किंगमेकर'
कुलदीप माने, एबीपी माझा February 09, 2026 11:13 PM

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने सत्ता स्थापनेच्या दिशेने पावले टाकली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष 18 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 16 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. 61 सदस्यीय सभागृहात मित्रपक्षांसह महायुतीचे संख्याबळ 31 वर पोहोचत असून महाविकास आघाडी 30 जागांवर आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी एक-एक जागा निर्णायक ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजयकाका पाटील पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीतून संजय काकांच्या राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या 5 जागा वजा केल्यास महायुतीची बेरीज 26 होते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 30 जागा आहेत. बहुमतासाठी 31 जागांची गरज असल्याने अजित पवार गटाच्या 5 जागांचे महत्त्व वाढले असून सत्ता समीकरणांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

वाळव्यात जयंत पाटलांचे वर्चस्व

तालुकानिहाय निकालात अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचे वर्चस्व स्पष्ट झाले. वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने 11 पैकी 8 जागा जिंकल्या. पलूस व कडेगावमध्ये आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी सर्व 8 जागा जिंकून आपले बालेकिल्ले कायम ठेवले. तासगाव व कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) चे आमदार रोहित पाटील यांनी 8 जागा जिंकत वर्चस्व राखले.

जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 9 पैकी 8 जागा जिंकल्या. शिराळ्यात महायुती विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना रंगला. कोकरूड गटातून जनसुराज्य शक्तीच्या साईतेजस्वी देशमुख विजयी झाल्या. त्या आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या आहेत. मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईकही विजयी झाले.

खानापूर आणि आटपाडी तालुक्यांत शिवसेना शिंदे गटाने अनुक्रमे 4 व 3 जागा जिंकल्या. निंबवडे गटातून आमदार पडळकर यांच्या भावजय माधवी पडळकर विजयी झाल्या. मिरज तालुक्यात भाजपने 11 पैकी 6 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी (अजित पवार) 1, राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेस प्रत्येकी 2 जागांवर विजयी झाले. कुंडल गटात ऋषिकेश लाड यांनी धनश्री लाड यांचा पराभव केला.

पंचायत समित्यांमध्येही विविध पक्षांची सत्ता दिसून आली. वाळवा व कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), मिरज व जतमध्ये भाजप, खानापूर व आटपाडीत शिवसेना शिंदे गट, तासगावमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार), शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी तर पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली.

जिल्हा परिषद पक्षनिहाय संख्याबळ :

भाजप – 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – 18
काँग्रेस – 11
शिवसेना (शिंदे) – 8
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 4
शिवसेना (ठाकरे) – 1
रयत क्रांती – 1
जनसुराज्य शक्ती – 1

एकूणच, सांगली जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणे अत्यंत चुरशीची बनली असून आगामी सत्तास्थापनेत संजयकाका पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.