वडिलांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा!
तिखे कुटुंबाचा ठाकरे गटाच्या नेत्यांवर आरोप
कल्याण ता. ९ (बातमीदार) : शिवसेना ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख रमेश तिखे यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांनीच पक्षाच्या स्थानिक नेत्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक असतानाही ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्याचे घाणेरडे राजकारण केले, असा खळबळजनक आरोप रमेश तिखे यांचे सुपुत्र तेजस तिखे यांनी केला आहे.
रमेश तिखे यांचा २६ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता; मात्र ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील, विधानसभा प्रमुख नारायण पाटील आणि युवासेना अधिकारी नीरज गुप्ता यांनी माध्यमांसमोर चुकीची माहिती पसरवल्याचा दावा तिखे कुटुंबाने केला आहे. ‘पोस्टर लावल्यामुळे पोलिसांचा दबाव आला आणि त्या मानसिक त्रासातून तिखे यांचा मृत्यू झाला,’ असे वृत्त या नेत्यांनी पसरवले होते, जे पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांच्या मुलाने म्हटले आहे.
वडिलांना २०१२ मध्येही हृदयविकाराचा झटका आला होता. हा मृत्यू नैसर्गिक असून, त्यावर पोलिसांचा कोणताही दबाव नव्हता. स्वतःच्याच पदाधिकाऱ्याच्या मृत्यूचे राजकारण करून या नेत्यांनी आमच्या कुटुंबाची सामाजिक बदनामी केली आहे. या खोट्या वृत्तामुळे माझी आई सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. तेजस तिखे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना कडक इशारा दिला आहे की, ज्याप्रमाणे माध्यमांसमोर खोटी माहिती दिली, त्याचप्रमाणे आता पुन्हा कॅमेऱ्यासमोर येऊन आपली चूक मान्य करावी आणि माझ्या आईची माफी मागावी. जर माझ्या आईच्या आरोग्याला काही बरे-वाईट झाले, तर त्याला हे तीन पदाधिकारी आणि ठाकरे गट जबाबदार असेल. तसेच, माफी न मागितल्यास आपल्याकडे असलेले सर्व पुरावे सार्वजनिक करण्याचा इशाराही तिखे कुटुंबाने दिला आहे. या आरोपामुळे कल्याणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता ठाकरे गट यावर काय स्पष्टीकरण देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.