सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.९ ः देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या ‘एआय इम्पॅक्ट’ परिषदेच्या आधी आलिशान हॉटेलचे दर गगनाला भिडले आहेत. ज्या हॉटेलचे दिवसाचा दर २० ते ४० हजार रुपयांच्या दरम्यान असते, त्या हॉटेलचा दर आता आवाक्याबाहेर गेले आहे. अनेक पंचतारांकित हॉटेलचे एका दिवसाचे आरक्षण दर लाखांच्या घरात गेले आहे.
‘भारत मंडपम्’मध्ये १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ‘एआय इम्पॅक्ट’ ही परिषद होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपन्यांचे देश - विदेशातील प्रतिनिधी, वक्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे लोक या परिषदेत सहभागी होणार आहेत. जगभरातील ३५ हजारपेक्षा प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काही हॉटेलमधील एका दिवसाचे भाडे तब्बल पाच लाख रुपयांवर पोहोचले आहे. आलिशान श्रेणीतील हॉटेलचे एका दिवसाचे भाडे चार लाख ते पाच लाख रुपयांच्या घरात गेले आहे.
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दी लीला पॅलेस, आयटीसी मौर्य आणि ताज हॉटेल्स ही प्रमुख हॉटेल आहेत. हाय एंड सूट्स, क्लब रुम आदी सुविधा असलेल्या या हॉटेलचे भाडे गगनाला भिडले आहे. मध्य दिल्लीतील ‘दी इंपिरियल’, ‘शांग्रीला इरोस’, ‘दी पार्क’ अशा हॉटेलमधील आरक्षण जवळपास ‘हाउसफुल’ झाले आहे. कॅनॉट प्लेसमधील ‘इंपिरियल हॉटेल’मधील १७ तारखेच्या एका खोलीचे भाडे अडीच लाख रुपयांवर गेले आहे तर ‘रॅडिसन ब्ल्यू’ हॉटेलमधील एका खोलीचे भाडे एक लाख रुपयांच्या वर गेले असल्याचे इक्सिगो ट्रॅव्हल पोर्टलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आलोक वाजपेयी यांनी सांगितले.
परिषद काळातील बहुतांश नामांकित हॉटेलचे एका दिवसाचे सरासरी भाडे एक लाख रुपयांच्या वर गेले आहे.
आलोक वाजपेयी, सीईओ, इक्सिगो ट्रॅव्हल पोर्टल