Yeolewadi Air Pollution: विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; येवलेवाडीतील खाणींमध्ये कचरा जाळणाऱ्यांवर कारवाईची मागणी
esakal February 10, 2026 06:45 AM

कोंढवा : येवलेवाडी परिसरातील खाणींमध्ये प्लॅस्टिक व विषारी कचऱ्याचे सातत्याने दहन केले जात आहे. कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्रथमेश ऑरा सोसायटीमागील खाणीत दररोज कचरा जाळण्यात येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. या धुराचा त्रास सन एक्झॉटिका, साई संस्कृती, अक्षय गॅलक्सीसह संपूर्ण येवलेवाडी परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. कोंढवा-बोपदेव घाट रस्त्यापर्यंत धुराच्या लाटा पसरत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनाही श्वसनाचा त्रास होत आहे.

Pune Air Pollution : पुण्याची हवा झाली ‘विषारी’; हवेची गुणवत्ता अत्यंत खराब, वाढत्या प्रदूषणावर तज्ज्ञांचा इशारा

अनेकवेळा बांधकामांचा राडारोडा टाकून खाणी बुजविण्याच्या उद्देशाने बाहेरून हा कचरा आणला जातो. मात्र, राडारोड्यातील प्लास्टिक व इतर ज्वलनशील कचरा जाळल्याने विषारी वायू निर्माण होऊन गंभीर परिस्थिती उद्भवत आहे. याप्रकरणी प्रशासनाने संबंधित जागा मालकांवर २५ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. परंतु, आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणांनी अधिक कठोर पावले उचलून या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

परिसरातील खाणीत सातत्याने प्लॅस्टिक व विषारी कचरा जाळला जात असल्याने आम्हाला श्वास घेणेसुद्धा कठीण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर याचा गंभीर परिणाम होत आहे. केवळ दंड आकारून ही समस्या सुटणार नाही. प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करत हे प्रकार थांबवायला हवेत.

-सिद्धार्थ देवरमणी, स्थानिक नागरिक.

Horn Sound : शहरात वाढली ‘हॉर्नची दहशत’! प्रेशर हॉर्न, मॉडिफाइड सायलेन्सरमधून वाजतात दचकवणारे फटाके

ही बाब अत्यंत गंभीर आहे. दंडात्मक कारवाईसह आम्ही थेट पोलिसांत जाऊन कारवाई करत आहोत. त्यामुळे यापुढे कोणीही या भागात कचरा टाकून तो जाळू नये, नाहीतर आम्ही कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत.

- राजू दुल्लम, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.