मालवण पोलिस प्रशासनाविरुध्द तक्रार
esakal February 20, 2026 04:45 AM

25695

मालवण पोलिस प्रशासनाविरुध्द आयुक्तांकडे तक्रार
जयंत बरेगार ः ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार
सावंतवाडी, ता. १९ ः माहिती अधिकार कायद्यांतर्गत बंधनकारक असलेली माहिती उपलब्ध नसणे आणि पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याने, माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी मालवण पोलिस प्रशासनाविरुद्ध राज्य माहिती आयुक्त (कोकण खंडपीठ) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी या तक्रारीद्वारे केली आहे.
२०१७ मध्ये वनविभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा (FIR ९/२०१७) तपास जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचा आरोप श्री. बरेगार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी मालवण पोलिसात लेखी तक्रार देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, १४ दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने २ जानेवारी २०२६ रोजी बरेगार यांनी पोलीसात ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान श्री. बरेगार यांनी माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ मधील १७ मुद्द्यांची माहिती आणि पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. यावर उत्तर देताना मालवण पोलीस निरीक्षकांनी ‘कलम ४’ ची माहिती उपलब्ध नाही’ आणि ‘सीसीटीव्ही बंद आहेत’ असे लेखी कळविले.
कायद्यानुसार २००५ पासून ही माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक असतानाही ती उपलब्ध नसणे आणि सीसीटीव्ही कधीपासून व का बंद आहेत याचे ठोस कारण न देणे, ही बाब संशयास्पद असल्याचे श्री. बरेगार यांनी म्हटले आहे. तपास यंत्रणेने जाणीवपूर्वक पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा गुन्हेगारांना वाचवण्यासाठी हे केले असल्याचा त्यांचा आरोप आहे.
या गंभीर प्रकारानंतर श्री. बरेगार यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे धाव घेतली आहे. माहिती अधिकार कलम २० नुसार दंड आकारणे, सीसीटीव्ही बंद असल्याबाबत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करणे आणि भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार सार्वजनिक सेवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची शिफारस त्यांनी केली आहे. या तक्रारीची प्रत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही कार्यवाहीसाठी पाठवली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.