Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी
esakal February 20, 2026 06:45 AM

अकोट : बिश्नोई गॅंगकडून अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मागणीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे अकोट शहराध्यक्ष हरिष टावरी यांना धमकीचा कॉल आल्याने संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संबंधितांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार दिवसांपूर्वी टावरी यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख शुभम लोणकर अशी करून दिली. त्याने आकोट मतदारसंघातील आमदाराकडून दोन कोटी रुपये वसूल करून देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास टावरी आणि संबंधित आमदार यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी थेट धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासन तातडीने सतर्क झाले असून संपूर्ण प्रकरण अत्यंत गोपनीयतेने हाताळले जात आहे. अधिकृत स्तरावर कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नसली, तरी शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Chorla Ghat : नाशिक ते बेळगाव धागेदोरे; चोर्ला घाट लूट प्रकरणाने उडवली राज्यसीमांपलीकडे खळबळ

संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक, कॉलसाठी वापरलेले अॅप तसेच संबंधित तांत्रिक माहितीची सखोल तपासणी सायबर तज्ज्ञांकडून सुरू आहे. कॉलचा स्रोत, त्यामागील व्यक्तींची ओळख आणि संभाव्य गुन्हेगारी जाळ्याशी असलेला संबंध याचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध तांत्रिक पुरावे तपासत आहेत.

राजकीय पदाधिकाऱ्याला थेट मोठ्या रकमेच्या खंडणीची मागणी करत जीवघेणी धमकी दिल्याच्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता कमी असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणामागील सत्य समोर आणण्यासाठी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून प्रशासनाच्या पुढील हालचालींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.