नाशिक: शहरात तोतया पोलिस बनून ज्येष्ठ महिला व नागरिकांना हेरून त्यांच्या अंगावरील सोन्याचे आभूषणे हातचलाखीने गंडा घालणाऱ्या सराईताला नाशिक रोड गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आंबिवलीत (ठाणे) पहाटे कारवाई करीत, त्याच्याकडून तब्बल १८ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
संशयित इराणीच्या अटकेने शहरातील दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. जाफर मालिक सय्यद उर्फ संजू इराणी (५३, रा. मंगल नगर, अटाळी गाव, ता. कल्याण, जि. ठाणे) असे संशयिताचे नाव आहे.
तांत्रिक तपासातून संशयित जाफर मलिक सय्यद ऊर्फ संजू इराणी हा आंबिवलीत असल्याची माहिती नाशिकरोड गुन्हेशाखेच्या पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक संदीप पवार यांना मिळाली होती. तो पहाटे ४ ते ५च्या दरम्यान आंबिवली रेल्वे स्थानक परिसरात चहा पिण्यासाठी येत असल्याची खबर मिळताच उपनिरीक्षक संदीप पवार, अविनाश देवरे, दत्तात्रेय चकोर, प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई, मंगला जगताप, मंगेश जगझाप, भरत राऊत, सहायक निरीक्षक जया तारडे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शहरातील विविध भागात साथीदारांसह लूट केल्याची कबुली दिली.
ज्येष्ठ महिलेची फसवणूक
२० नोव्हेंबर २०२५ रोजी उपनगर परिसरातील शिवाजीनगर येथे ७४ वर्षीय जुलैखा नजीर शेख महिलेची सोनसाखळी तोतया पोलिस बनून त्याने लंपास केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयिताचा फोटो मिळविला. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित हा इराणी टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले.
गुजरातसह विविध ठिकाणी विक्री
चोरीतील काही सोन्याचे दागिने संशयित इराणी याने गुजरातमधील अहमदाबाद येथे विकल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी तेथे जाऊन दागिने जप्त केले. तसेच काही दागिने आंबिवली परिसरातूनही हस्तगत करण्यात आले. संशयिताकडून १८ लाख रुपयांचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
Automation & AI Threat to Jobs : पुढील 10 वर्षांत गायब होऊ शकतात 'या' 6 नोकऱ्या; पाहा तुमची नोकरी यादीत आहे का?अशी असते मोडस
संशयित हे ज्येष्ठ महिला-नागरिकांना हेरायचे. त्यानंतर त्यांच्याजवळ जाऊन, पुढे महिलेचा खून झाला आहे, महिलेला चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले आहे, पुढे दंगा झाला आहे अशी कारणे देत संशयित स्वत:ची ओळख पोलिस असल्याची करून देतात आणि सार्वजनिक ठिकाणी अंगावर दागिने घालून फिरू नये, असे म्हणत विश्वास संपादन करतात. ज्येष्ठ महिला अंगावरील आभूषणे काढून असताना संशयित मदतीचा बहाणा करतात आणि हातचलाखीने कागदात दागिने ठेवताना दर्शवितात. प्रत्यक्षात दगड ठेवलेले कागदाची पुडी महिलेच्या हातात देतात आणि पसार होतात.
दहा गुन्ह्यांचा उलगडा
उपनगर (२), इंदिरानगर (५) आणि नाशिक रोड (३) पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या एकूण दहा गुन्हे संजू इराणीच्या अटकेमुळे उघडकीस आले आहेत. उलगडा झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.