एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयात राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
esakal February 21, 2026 07:46 PM

पिंपरी, ता. २१ : मोरवाडी येथील एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयात ‘श्रीमती सुभद्रा भोसले पाचवी राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन अभिरूप न्यायालय (मूट कोर्ट) स्पर्धा’ उत्साहात पार पडली. यामध्ये ३२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत आय. एल. एस. विधी महाविद्यालय यांनी विजेतेपद पटकावले, तर हैदराबाद, तेलंगणा येथील एस.व्ही.के.एम.एन.एम.आए.एम.एस. स्कूल ऑफ लॉने उपविजेतेपद मिळवले.
विधी शाखेतील विद्यार्थ्यांना वकिली कौशल्ये, कायदेविषयक संशोधन (लीगल रिसर्च) आणि वादविवाद कौशल्यांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अरुणा फारसवाणी (माजी मुख्य न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, ठाणे) उपस्थित होत्या. पारितोषिक वितरण समारंभास प्रा. डॉ. एम. एच. हिराणी (माजी विधी विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), ॲड. वैभव कुलकर्णी (अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय) तसेच डॉ. प्रियांका अग्रहारी (प्राचार्या, एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल, मोरवाडी) उपस्थित होते.
‘बेस्ट मेमोरियल’ पुरस्कार किशनचंद चेलाराम लॉ कॉलेज (मुंबई) यांना मिळाला, तर ‘बेस्ट ॲडव्होकेट’चा मान गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ, नवी दिल्ली येथील विधी विभागाच्या आद्या कुमार यांना प्रदान करण्यात आला. विजेत्या संघास ट्रॉफी व रोख पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून ॲड. अर्पिता गोस्वामी यांनी जबाबदारी सांभाळली. प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयाच्या मूट कोर्ट सोसायटीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.