Kolhapur Foundries : कोल्हापुरात 'ग्रीन कास्टिंग'चा पथदर्शी प्रकल्प; पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर अडवाणी, फाउंड्रीतील निर्यात वाढणार
esakal February 21, 2026 07:46 PM

कोल्हापूर : ‘जागतिक पातळीवर पर्यावरणपूरक उत्पादन निर्मितीला वाढत असलेले प्राधान्य लक्षात घेऊन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) योगदान देण्याचे ठरविले आहे.

सीआयआयकडून कोल्हापुरातील ११ फाउंड्री उद्योगांत ग्रीन कास्टिंग उत्पादनाचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात असल्याचे सीआयआयचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आणि ब्ल्यू स्टार लिमिटेडचे अध्यक्ष वीर अडवाणी यांनी आज येथे सांगितले.

Premium|sustainable cities : शाश्वत शहरांच्या उभारणीसाठी नव्या लोकप्रतिनिधींचे आव्हान; स्मार्टपेक्षा शाश्वत विकासाला प्राधान्य

सीआयआयच्या दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या सभासद बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी ते कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अडवाणी म्हणाले, ‘सीआयआयच्या हैदराबादमधील ग्रीन बिझनेस सेंटरच्या माध्यमातून या ११ फाउंड्रींमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून ग्रीन कास्टिंग निर्मितीचा प्रकल्प राबविला जात आहे.

एप्रिलपर्यंत प्रकल्पाची मुदत आहे. ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित फाउंड्रींना ग्रीन कास्टिंग प्रॉडक्शनचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतर पुढील टप्प्यात पूर्ण देशभर सीआयआयकडून संबंधित प्रकल्प राबविला जाईल.

Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अॅडास सिटी’ सज्ज

कोल्हापुरातील प्रगत फाउंड्री उद्योग हा देशातील इतर राज्यांनी अनुकरण करावा असा आहे. इथल्या औद्योगिक प्रगतीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. लवकरच कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करेल.’

ते पुढे म्हणाले, ‘अमेरिकेने टॅरिफ कमी केले असून, आपल्या देशाने युएई, यु. के. आदी देशांसमवेत नव्याने करार केले आहेत. त्यामुळे ऑटोमोटीव्ह, कृषी अवजारे उत्पादने आदींसह फाउंड्रीतील कास्टिंगची देखील निर्यात वाढणार आहे.

औद्योगिक क्षेत्रांमध्ये दर्जेदार, पर्यावरणपूरक, अल्प खर्चातील आणि एआयसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन निर्मितीसाठी सीआयआयकडून भर दिला जात आहे. त्यासाठी उद्योगांना मार्गदर्शन केले जात आहे.’ यावेळी ‘सीआयआय’ दक्षिण महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष सारंग जाधव, उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, संचालक वैशाली श्रीवास्तव,  मोहन गावडे, राजाराम काळे उपस्थित होते.

उत्पादन क्षेत्रात कोल्हापूर आघाडीवर राहणार

‘पश्चिम महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, क्लीन कुलिंग तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन परिसंस्था ही औद्योगिक क्षेत्रे वेगाने वाढू शकतात. विशेषतः कोल्हापूरमधील अभियांत्रिकी आणि फाउंड्री उद्योगाला शासनाचे पाठबळ मिळाल्यास हे शहर राष्ट्रीय उत्पादन क्षेत्रातील अग्रणी ठरू शकते’, असे अडवाणी यांनी सांगितले.

अडवाणी म्हणाले...

एमएसएमई उद्योगांना एमएनएस बनविण्याचे सीआयआयचे ध्येय

एआय क्षेत्रातील गुंतवणूक आणखी वाढणार

सरकार आणि कंपन्यांनी संशोधन - विकासावर भर देण्याची गरज

दर जास्त असले तरी गुणवत्ता, विश्वासामुळे जगभरातून भारतीय उद्योगांना काम

एअर कंडिशनर निर्मितीत कॉपरऐवजी ॲल्युमिनिअमच्या वापराचा प्रयत्न

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.