पुणे - नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यासह (सिंहगड रस्ता) महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होऊ शकणाऱ्या सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात असून एप्रिलअखेरपर्यंत ते पूर्ण होऊ शकते. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर या दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगर, कोथरूड परिसरात तसेच कोथरूड, कर्वेनगर येथून सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रजला जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या भागातील नागरिकांकडून दररोज महामार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी पुणे - बंगळूर महामार्गावर वारजे येथील पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
या पार्श्वभूमीवर, महापालिकेकडून सनसिटी ते कर्वेनगर या दरम्यान मुठा नदीवर पुल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार, मे २०२३ मध्ये पुलाच्या कामासाठी कार्यादेश निघाला, तर सप्टेंबर २०२३ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
मागील अडीच वर्षांपासून पुलाचे काम सुरू आहे. त्यानुसार, कर्वेनगरकडील बाजुला खांब, गर्डर टाकण्याचे तसेच पोहोच रस्त्याचे काम झाले आहे, तर सनसिटीकडील बाजुच्या सहा खांबांपैकी चार खांबांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित खांबांचे काम सुरू आहे. सनसिटीकडील बाजूला स्पॅन, पुलाच्या उतारासाठीचे काम अद्याप झालेले नाही.
संबंधित काम पूर्ण होण्यास आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंना पोहोच रस्ते, डांबरीकरण, विद्युत दिवे, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, पदपथ अशी कामे शिल्लक आहेत. येत्या दोन महिन्यांत संबंधित कामेही पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. एप्रिलअखेरपर्यंत संबंधित कामे पूर्ण करून हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी विशेष प्रकल्प विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
पुलामुळे होणारे फायदे
सिंहगड रस्ता, राजाराम पूल, कर्वेनगरमधील वाहतुकीचा ताण कमी होणार
महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार
सिंहगड रस्ता ते कोथरूड दरम्यानच्या प्रवासासाठी कमी वेळ लागणार
अपघात, वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका होणार
विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांसह रहिवाशांचा प्रवास होणार सोपा
पुलाची वैशिष्ट्ये
पुलाची लांबी - २७९ मीटर
रुंदी - ३० मीटर
पोहोच रस्त्याची लांबी (सॉलिड रॅम्प) - ३४ मीटर
(कर्वेनगर बाजू) - २० मीटर (सनसिटी बाजू)
पोहोच रस्त्याची रुंदी - ३० मीटर
एकूण गाळे - ९
अस्तित्वातील रस्त्याची रुंदी - ३० मीटर (सनसिटी बाजू)
पुलाच्या कामासाठी येणारा खर्च - ४४ कोटी ८६ लाख रुपये
सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कर्वेनगरकडील पुलाचे काम झाले आहे, आता सनसिटीकडील काम सुरू असून एप्रिल अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.
- दिनकर गोजारे, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, पुणे महापालिका