Nashik News : पुरोगामी पाऊल! नाशिकमध्ये चित्रकथी समाजाची जातपंचायत बरखास्त; अनिष्ट प्रथांना कायमची मूठमाती
esakal February 22, 2026 04:45 AM

नाशिक: अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या जातपंचायत मूठमाती अभियानाला नाशिकमध्ये मोठे यश मिळाले आहे. राज्यातील चित्रकथी समाजाची जातपंचायत अधिकृतपणे बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय शुक्रवारी (ता. २०) समाजबांधवांनी एकमताने घेतला. भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना आणि ‘अंनिस’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा पुरोगामी टप्पा गाठला गेला.

नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्यभरातून आलेल्या चित्रकथी समाजबांधवांसह भटके-विमुक्त समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जातपंचायत बरखास्तीचा निर्णय घेतल्याबद्दल समाजातील प्रतिनिधींना संविधानाची प्रस्ताविका देऊन सन्मानित करण्यात आले.

कुप्रथांवर निर्णायक घाव

बैठकीत अनेक क्रांतिकारी निर्णय जाहीर करण्यात आले. यात आंतरजातीय विवाहास अधिकृत मान्यता, बालविवाहास सक्त बंदी, कोणत्याही कारणाने वाळीत टाकणे (बहिष्कार) यावर प्रतिबंध, आर्थिक दंडाची प्रथा रद्द या निर्णयांमुळे समाजातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. जातपंचायतीच्या निर्णयामुळे वर्षानुवर्षे बहिष्कृत ठरविण्यात आलेल्या कुटुंबीयांनी कार्यक्रमात उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.

एका महिलेच्या डोळ्यांतील आनंदाश्रू

आंतरजातीय विवाह केल्याने एका महिलेला पाच वर्षांपासून माहेरी व समाजात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ती या कार्यक्रमाला उपस्थित होती. आजच्या निर्णयामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या तिच्या भावाच्या विवाहाला तिला उपस्थित राहता येणार आहे. हा निर्णय जाहीर होताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत केले.

संविधानाच्या मार्गाने न्याय

“पारंपरिक जातन्याय व्यवस्थेऐवजी संविधानाने दिलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला आम्ही स्वीकारत आहोत,” असे मत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले. समाजातील प्रश्न आता कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने सोडविण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला. या प्रक्रियेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले. कृष्णा चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. टी. आर. गोरणे यांनी आभार मानले. कोमल वर्दे, मनीषा अटक, जगदीश चित्रकथी, प्रवीण शिंदे, गणेश चित्रकथी, विनोद शिंदे, निंबा जाधव, गोपीचंद इंगळे आदी उपस्थित होते. नंदुरबार, अहिल्यानगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून समाजबांधव सहभागी झाले होते. चित्रकथी समाजाने घेतलेला हा निर्णय केवळ एका जातपंचायतीच्या बरखास्तीपुरता मर्यादित नसून, भटके-विमुक्त समाजातील कुप्रथा व अंधश्रद्धांविरोधातील व्यापक लढ्याची नांदी ठरत आहे. संविधानिक मूल्यांवर आधारित न्यायव्यवस्था स्वीकारण्याचा हा निर्णय समाजपरिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जातो.

Kolhapur लोकशाही संरक्षणासाठी कृतिशील सहभाग द्या; निरंजन टकले, कॉ. गोविंद पानसरे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

जातपंचायत ही संविधानविरोधी अन्याय व्यवस्था आहे. आणखी एक जातपंचायत बरखास्त झाल्याने लोकशाही बळकट होण्यास मदत होईल. संबंधित सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो.

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान

‘अंनिस’च्या जातपंचायत मूठमाती अभियानाला आम्ही पाठिंबा देत आहोत. त्यामुळे आम्ही पुरोगामी निर्णय घेतले आहेत. पुढील काळात समाजप्रबोधनाची कामे एकत्रितपणे करू.

- जगदीश चित्रकथी, पदाधिकारी, चित्रकथी समाज

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.