संरक्षक कंपाउंड तोडून द्रुतगती मार्गावर प्रवेश
esakal February 22, 2026 04:45 AM

सोमाटणे, ता. २१ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील लोखंडी संरक्षक कठडे तोडून अज्ञातांनी अनधिकृत प्रवेश मार्ग तयार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या बेकायदेशीर प्रवेशामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
द्रुतगती मार्गावर अपघात टाळण्यासाठी अधिकृत प्रवेशद्वारांशिवाय इतर ठिकाणांहून वाहने, वन्यप्राणी किंवा मोकाट जनावरे रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत रस्त्याची देखभाल करणाऱ्या आयआरबी कंपनीने संपूर्ण ९४ किलोमीटर अंतरावर मजबूत लोखंडी संरक्षक कंपाउंड उभारले आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी या कंपाउंडची दुरुस्ती केली जाते. यंदाही नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती. मात्र, काही अज्ञात वाहनचालकांनी स्वतःच्या सोयीसाठी जेसीबीच्या साहाय्याने हे लोखंडी कंपाउंड तोडून अनधिकृत प्रवेशमार्ग तयार केले आहेत. या मार्गांवरून अवजड वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक सुरू असून, अचानकपणे द्रुतगती मार्गावर प्रवेश करताना गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

‘‘वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी द्रुतगती मार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित आहे. मात्र, हे अनधिकृत प्रवेशमार्ग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेस न पडल्याने रस्त्याची देखरेख करणाऱ्या आयआरबी कंपनीलाही त्यांचा तातडीने मागोवा घेता येत नाही. अनधिकृत प्रवेशमार्ग केले असतील तर ते तातडीने बंद केले जातील.
- डी.ए.के. जोसुआ, सुरक्षा विभाग प्रमुख, आयआरबी कंपनी

PNE26V95934
---

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.