lightning Strike : वायगाव येथे शेतकऱ्यावर विज कोसळून दुर्दैवी मृत्यू
esakal February 24, 2026 12:45 AM

उदगीर, (जि. लातुर) - तालुक्यातील वायगाव येथे आज सायंकाळी सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान शेतात काम करत असताना एका शेतकऱ्यावर विज कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वायगाव (ता. उदगीर) येथील रहिवासी दिगंबर राम बेळकुंदे (वय-६०) हे आपल्या शेतात गव्हाचे पीक गोळा करण्याचे काम करत होते. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन सुमारे साडेचार वाजल्यापासून उदगीर शहर व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह हलक्या सरी सुरू झाल्या होत्या.

सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक जोरदार कडकडाटासह विज कोसळली आणि ती थेट बेळकुंदे यांच्या अंगावर पडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर शेजारील शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी उदगीर येथील खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या आकस्मिक घटनेमुळे बेळकुंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित अपघातग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून मिळणारी तातडीची आर्थिक मदत करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली आहे.

हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविल्याने नागरिकांनी उघड्यावर काम करताना काळजी घ्यावी. विशेषतः शेतकरी बांधवांनी ढगाळ वातावरण व विजांचा कडकडाट सुरू झाल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.