भिगवण प्रकरण: अपहरण-लव्ह जिहादचा आरोप; तरुणी म्हणते 'मी माझ्या मर्जीने गेले'
BBC Marathi February 24, 2026 12:45 AM
ANI भिगवण पोलीस

"मी पूर्णपणे सज्ञान असल्याने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे," पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे घडलेल्या कथित अपहरण प्रकरणातील तरुणीच्या शपथपत्रातली ही ओळ या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

भिगवण येथील या तरुणीने बारामती शहर पोलिसांकडे सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रात बरेच खुलासे केले आहेत.

तिचं म्हणणं आहे की, "मागच्या एक वर्षापासून माझे झहीर शेख यांच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्याला माझ्या कुटुंबीयांचा विरोध होता. मी माझ्या मर्जीने झहीर शेख सोबत गेले होते आणि मला त्याच्याशी लग्न करायचं होतं."

या तरुणीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानंतरही आज (23 फेब्रुवारी) भिगवण, इंदापूर आणि दौंडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

तत्पूर्वी 18 फेब्रुवारी रोजी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा घेण्यात आला.

हिंदुत्ववादी संघटनांकडून 'लव्ह जिहाद'चे आरोप करण्यात आले मात्र यासंदर्भात फिर्यादी किंवा इतर कुणाकडूनही पुरावे सादर झाले नसल्याने पोलिसांनी तूर्तास झहीर शेख याला सोडलं आहे आणि स्थानिक न्यायालयाने या संबंधित तरुणीला पाच दिवसांसाठी सुधारगृहात पाठवलं आहे.

भिगवण येथील हे कथित अपहरणाचं प्रकरण नेमकं काय आहे? संबंधित तरुणीची सुधारगृहात रवानगी का करण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गदारोळात नागरिकांच्या संवैधानिक हक्कांबाबत तज्ज्ञांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

नेमकं प्रकरण काय?

या तरुणीच्या आईने पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, '17 फेब्रुवारी 2026 संबंधित तरुणी तिची आई आणि भाऊ भिगवण येथे खरेदीसाठी गेले असता आरोपी झहीर आणि त्याच्या भावाने तरुणीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर आरोपींनी संबंधित मुलीची आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि या मुलीचं अपहरण केलं.'

या तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, 'झहीर शेख हा या कुटुंबाच्या शेजारीच राहतो आणि त्याने माझ्या मुलीचं अपहरण केलं आहे.'

या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

या तरुणीचं कथित अपहरण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये 'लव्ह जिहाद'सह अपहरणाचे आरोप करण्यात आले.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी (19 फेब्रुवारी) संबंधित तरुणीने बारामती शहर पोलिसांकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करून, ती तिच्या मर्जीने झहीर शेख सोबत पळून गेल्याचा खुलासा केला.

या प्रतिज्ञापत्रात ती झहीर शेखसोबत मागच्या एका वर्षापासून प्रेमसंबंधात असल्याचं आणि त्यांच्या नात्याला आई आणि भावाचा विरोध असल्याचं देखील या तरुणीने सांगितलं आहे.

तसेच, "माझं अपहरण झालेलं नाही. मीच झहीरला फोन करून बोलावलं होतं. आई आणि भावाची नजर चुकवून मी स्वतः त्याच्या गाडीत बसले. माझं दुसरीकडे लग्न ठरवण्यात आलं होतं, माझा त्या लग्नाला विरोध होता आणि म्हणून मी झहीर शेखसोबत गेले." असं देखील या तरुणीने म्हटलं आहे.

हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय नेत्यांनी लावलेले लव्ह जिहादसारखे आरोप देखील या तरुणीने फेटाळून लावले आहेत.

'आईच्या तक्रारीत आणि मुलीच्या जबाबात तफावत' — पोलीस

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी माध्यमांना सांगितलं ,"भिगवण पोलीस ठाण्यात 17 फेब्रुवारी रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित मुलगी आणि आरोपी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मुलीची आई आणि तिच्या जबाबात तफावत दिसून येत आहे. पोलिसांकडे येण्याआधी एका व्हिडिओमध्ये त्या तरुणीने म्हटलं आहे की ती स्वतःच्या मर्जीने आरोपी मुलासोबत गेली होती. तिने कोर्टासमोरही तिचं मत मांडलं आहे. तपास सुरू आहे."

ANI पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल

पुण्यातील बारामती विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "या प्रकरणात झहीर शेख याच्याविरुद्ध तक्रार दाखल झालेली आहे. आयान शेख अजूनही फरार असून आम्ही पुढील तपास करत आहोत. संबंधित मुलीने कोर्टात जबाब दिल्यानंतर कोर्टाने तिला पाच दिवसांसाठी सुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे."

"झहीर शेख हा या प्रकरणातला आरोपी असल्याने आम्ही या मुलीला त्याच्या घरी पाठवू शकत नव्हतो आणि त्यामुळे कोर्टाने मुलीची रवानगी सुधारगृहात केलेली आहे. आम्ही कॉल रेकॉर्डिंग आणि इतर तपास करत आहोत. झहीर शेख याला प्राथमिक चौकशी नंतर सोडून देण्यात आलेलं आहे आणि तक्रारदाराकडून इतर आरोपांबाबत कुठलेही पुरावे सादर केले नसल्याने आम्ही त्याला सोडून दिलेलं आहे."

जोडीदाराच्या निवडीबाबत कायदा काय सांगतो?

भारतीय कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा अधिक वयाची स्त्री स्वतःच्या इच्छेने विवाह किंवा सहजीवनाचा निर्णय घेऊ शकते.

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 अंतर्गत व्यक्तीच्या जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार संरक्षित आहे.

जर संबंधित व्यक्ती सज्ञ असून कोणतीही जबरदस्ती नसल्याचं स्पष्टपणे सांगत असेल, तर तिच्या निवडीचा सन्मान करणं ही सरकारची जबाबदारी ठरते.

या प्रकरणात तरुणीने प्रतिज्ञापत्रात तसेच पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात "मी स्वतःच्या मर्जीने गेले" असं स्पष्टपणे नमूद केलं आहे.

ANI या प्रकरणानंतर भिगवणमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला

याबाबत बोलताना महिला हक्क कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, "ज्यांच्याविषयी प्रेम वाटलं त्यांच्यासोबत लग्न करण्याचा आणि आनंदाने राहण्याचा अधिकार प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आहे. त्याविरोधात आई-बाप, धर्म, राजकारण कुणीही येऊ शकत नाही. ती स्वतंत्र भारताची नागरिक आहे. तिला काय करायचं हा सर्वस्वी तिचा अधिकार आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "आई-वडिलांची परवानगी अनिवार्य करणारे कायदे संविधानाच्या विरोधातले असतील. असे कायदे टिकणार नाहीत."

अॅड. रंजना गवांदे म्हणाल्या, "प्रत्येकाच्या निवडीचा सन्मान केला पाहिजे असं संविधान सांगतं. विशिष्ट धर्माविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी अशा प्रकरणांना 'लव्ह जिहाद'चं लेबल लावलं जातं. प्रेम ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे."

त्यांच्याकडे मुलगी गेली तर आम्ही इथेच आत्महत्या करणार - मुलीची आई

भिगवण येथील या तरुणीला सध्या सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तिने कोर्टासमोर जबाब नोंदवला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं की, "संबंधित मुलीने प्रतिज्ञापत्रात दिलेला जबाब कोर्टासमोर मांडला आहे. यानंतर तिने आईसोबत जाण्यास नकार दिलेला आहे."

या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना तरुणीच्या आईने आरोप केला की, "माझ्या मुलीला ती 12 वर्षांची असल्यापासून धमक्या दिल्या जात आहेत. तिने दबावात हा निर्णय घेतला आहे. माझी मुलगी त्यांच्यासोबत गेली तर आम्ही इथेच आत्महत्या करणार आहोत. सध्या ती माझ्यासोबत यायला नकार देत आहे. तिचे भाऊ लहान असल्यामुळे तिच्यावर दबाव आणला आहे. तिचं सगळं खोटं आहे. ती अजूनही दबावात आहे. आरोपींनी आमच्या घरी पुरुष नसल्याचा फायदा घेऊन मुलीवर दबाव टाकला आहे."

आईने लावलेल्या या आरोपांना गोपीचंद पडळकर यांनी देखील दुजोरा दिला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "या मुलीने एका व्हीडिओमध्ये स्वतःहून असं सांगितलं आहे की मागच्या नऊ वर्षांपासून ती संबंधांमध्ये आहे. सध्या तिचं वय 21 वर्षे आहे तर मागच्या नऊ वर्षांपासून म्हणजे ती 12 वर्षांची असल्यापासून तिच्यावर अत्याचार होतो आहे त्यामुळे आमची मागणी आहे की या प्रकरणात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे."

उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड म्हणाले, 'लव्ह जिहाद सारखे आरोप लावण्यात आले आहेत मात्र तसे पुरावे नसल्याने आम्ही आरोपीला सोडलं आहे. या प्रकरणात आणखीन एक आरोपी फरार आहे आम्ही सर्व कॉल डेटा रेकॉर्डिंग (सीडीआर) तपासून पुढील कारवाई करत आहोत."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • राज्यात 'लव्ह जिहाद' कायदा आणून काय साध्य होणार?
  • महाराष्ट्रात कथित 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन, तज्ज्ञांचं म्हणणं काय?
  • आता 'लव्ह जिहाद'बाबत समिती स्थापन, पण आधीच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचं काय झालं?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.