नाशिक: शहर परिसरातून चोरट्यांनी सहा दुचाकी चोरून नेल्या असून, चोरीच्या घटनांनी वाहनचालक बेजार झाले आहेत. पोलिसांकडून सातत्याने नाकाबंदी करून तपासणी केली जात असतानाही दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. त्यामुळे दुचाकी चोरट्यांचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
ज्ञानेश्वर काशिनाथ पगार (रा. कोमल सोसायटी, दूर्गानगर, पेठरोड) यांची २९ हजारांची मोपेड (एमएच १५ एफझेड १५०२) गेल्या मंगळवारी (ता. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शुभम विरेंद्रकुमार विश्वकर्मा (रा. अमृतमय सोसायटी, पेठरोड) यांची ६० हजारांची दुचाकी (एमएच १५ एचआर ४२०९) गेल्या शुक्रवारी (ता. २०) सकाळी ७ ते ९ यादरम्यान अयोध्यानगरीतील गोविंद प्लाझाच्या पार्किंगमधून चोरट्याने चोरून नेली.
तर, हेरंब रवींद्र कुलकर्णी (रा. मुकुंद अपार्टमेंट, इंद्रकुंड) यांची ३० हजारांची स्कूटर (एमएच १५ एफपी ८८६६) गेल्या १५ ते १८ तारखेदरम्यान राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली. तसेच, सुदाम चिमण समशेर (रा. समतानगर, टाकळीरोड) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ सीवाय ३७३१) गेल्या शुक्रवारी (ता. २०) गोदाघाटावरील गंगागोदावरी मंदिराच्या मागे पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत दुचाकी चोरीचे तीन गुन्हे दाखल केले आहेत.
ST Smart Card: एसटीच्या सवलतीला लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य, रिचार्जही करावा लागेल; कसं मिळणार कार्ड?चेतन जयलाल जयस्वाल (रा. विनयनगर) यांची २० हजारांची मोपेड (एमएच १५ ईवाय ५५२९) नेहरू गार्डन येथे पार्क केली असता, गुरुवारी (ता. १९) रात्री दहाच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तर, मनोज प्रभुदास छग (रा. कृष्णप्रसाद अपार्टमेंट, कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळ) यांची १ लाख ७ हजारांची मोपेड (एमएच ४७ सीए ३२३४) गेल्या १५ तारखेला मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
शहर पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात असली तरी दुचाकी चोरट्यांचे मोठ्या प्रमाणात फावले आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांचा शोध घेऊन वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.