सातपूर: औद्योगिक परिसरालगतच्या वासाळी शिवारातील प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या दोन गुदामांना रविवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. नीलेश पोपट पाटील यांच्या मालकीच्या या गुदामात कच्चे व तयार प्लॅस्टिक साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यात मशिनरी, कच्चा माल आणि पत्र्याचे शेड खाक झाले असून, सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच सातपूर, पंचवटी, नाशिक रोड, सिडको आणि एमआयडीसी केंद्रांचे बंब घटनास्थळी दाखल झाले. प्लॅस्टिकमुळे परिसरात धुराचे काळे लोट पसरले होते, ज्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडथळे येत होते. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.
Hulikunteshwara Temple : 'देवा, माझी सासू पुढच्या जत्रेआधी मरू दे..'; दानपेटीत शंभराच्या नोटेवर नवसाची चिठ्ठी, धक्कादायक मजकूरअग्निशामक दलाचे अधिकारी एस. आर. पगार, हर्षल पटेल, एस. आर. जाधव, आर. पी. चौधरी, श्रीकांत नागपुरे व विजय नागपुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.