बेटा : ढॅण टढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्यात निमग्न...) हं! आलास? बरं झालं...तुला बोलावून घेणारच होते!
बेटा : (खांदे उडवत) मी नेहमीच येतो की! बोलावून घेण्याची काय गरज?
मम्मामॅडम : (गांभीर्यानं) हे मी काय ऐकते आहे? एआय परिषदेच्या मांडवात आपल्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला म्हणे!
बेटा : (अभिमानाने) कार्यकर्ते म्हणून हिणवू नका त्यांना! ते क्रांतिकारक होते...
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) कसली डोंबलाची क्रांती?
बेटा : (सात्विक संतापाने) हेच...हेच तुमचं चुकतं! आपल्या आंदोलक कार्यकर्त्यांनी प्राणांची बाजी लावून शत्रूच्या गोटात प्रवेश केला, आणि त्यास दे माय धरणीठाय करुन सोडलं! मला माझ्या आंदोलक युवा सहकाऱ्यांबद्दल अभिमान वाटतो!
मम्मामॅडम : (तक्रारीच्या सुरात) तुमच्या कार्यकर्त्यांमुळे देशाची अब्रू धुळीला मिळाल्याचा आरोप होतोय, माझ्यावर! आपला पक्ष अशी आंदोलनं करत नाही, बेटा! ते आपल्याला शोभत नाही...
बेटा : (आक्रमक शैलीत) माझ्या क्रांतिकारक भावांचा इंगा आता कळला असेल त्या कमळवाल्यांना! पुन्हा ही असली एआय, बिआयची नाटकं करणार नाहीत लेकाचे!! कसली ती एआय परिषद? मोदीजींची पीआर परिषद होती ती! स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी असला बाजार भरवण्याची काय गरज होती? नॉन्सेन्स!!
मम्मामॅडम : (काहीही न कळून) नेमकं घडलं तरी काय? इतका गहजब कशामुळे होतोय?
बेटा : सगळं सांगतो...बिनशर्ट पाठिंब्याबद्दल ऐकलं आहेस? महाराष्ट्रात एका पक्षानं कमळवाल्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता...
मम्मामॅडम : (आठवण्याचा प्रयत्न करत) अंधूक आठवतंय! त्यांना तरी आठवत असेल की नाही कुणास ठाऊक!
बेटा : तसाच आम्ही बिनशर्ट विरोध केला!...भारत मंडपम नावाच्या त्या भंपकम मैदानात मोदीजींनी एआय समिटच्या नावाखाली कुभांड रचलं! देश कशी प्रगती करतो आहे, याचं खोटं चित्र तयार करून दाखवलं! देशोदेशीचे नेते त्यासाठी बोलावले होते, त्यांच्यासमोर त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठी माझे कार्यकर्ते स्वतः उघडे झाले...
मम्मामॅडम : (संयमी सुरात) शी:!! हे काय वागणं झालं?
बेटा : (निषेधाच्या सुरात) वा रे वा! प्राणांवर बेतलं, ते शर्टांवर निभावलं! माझ्या मर्द कार्यकर्त्यांनी तिथं शर्ट उलटे घालून शिरकाव केला! शर्टांवर निषेधाचा मजकूर लिहिला होता...
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडत) शर्टावर मजकूर? कसला?
बेटा : (समजावून सांगत) हल्ली नाही का, ‘जाम कंटाळा आलाय’, ‘मी सर्वज्ञ आहे’, ‘चला, बसू या’ वगैरे मेसेज लिहिलेले टीशर्ट मिळतात! तसलेच टीशर्ट, पण उलटे घालून गेले!! हाहा!!
मम्मामॅडम : (कसनुसं हसत) ते ठीक आहे, पण तिथं गेल्यावर...अब्रू कशाला घालवायची?
बेटा : (सपशेल दुर्लक्ष करत) बघता बघता क्रांतिकारकांनी आपापले टीशर्ट पटकन सुलटे करून घातले! पण कोणीही लक्ष देईना! मग त्यांनी शर्ट काढूनच टाकल्यावर लोकांचं लक्ष गेलं! अखेर शत्रूच्या गोटाला खबर लागली, आणि त्यांनी चहूकडून क्रांतिकारकांच्या जत्थ्याला घेरण्याचा प्रयत्न केला! पण क्रांतिकारक जबरी होते, जिवाची बाजी लावत ते पळत सुटले, ते थेट चांदणी चौकात येऊनच थांबले!!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) एवढं करायचं काही अडलं होतं का? त्यामुळे त्या कमळवाल्यांचं फावलं! तुमच्यामुळे देशाची अब्रू गेली असं म्हणतायत ते!!
बेटा : (चिडून) डॅम इट! आम्ही काहीही केलं तरी त्यांचं फावतंच, काय करणार? त्यांचं फावतं, म्हणून आम्ही काय स्वस्थ बसायचं? हॅ:!!