वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने ३५ लाखांची फसवणूक
esakal February 24, 2026 11:45 AM

भिवंडी, ता. २३ (वार्ताहर) : तालुक्यातील काल्हेर येथील एका मेडिकल दुकान मालकाच्या मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात व्हीआयपी कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून तब्बल ३५ लाख ४२ हजार ९९० रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काल्हेर येथील मेडिकल दुकानमालक राजेश चौधरी यांच्या मुलाला वैद्यकीय शाखेत प्रवेश हवा होता. दरम्यान त्यांची ओळख बाळकूम येथील प्रशांत महाजन याच्याशी झाली. महाजनने चौधरी यांचा मुलगा निखिलला व्हीआयपी कोट्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार १० मे २०२४ पासून ते आजपर्यंत महाजनने तक्रारदारांच्या काल्हेर येथील ‘काव्या मेडिकल’ येथे येऊन गुगल पे व रोख स्वरूपात एकूण ३५ लाख ४२ हजार ९९० रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, संबंधित विद्यार्थ्याला वैद्यकीय शाखेत प्रवेश न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी २२ फेब्रुवारीला पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून प्रशांत महाजनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.