खेड शिवापूर, ता. २३ : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात लागवड झालेल्या हळवा कांद्याच्या काढणीला सध्या खेड शिवापूर परिसरात वेग आला आहे. मात्र सध्या बाजारात कांद्याचे भाव कोसळले आहेत. त्यातच हळवा कांदा साठवणूक करता येत नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या किमतीत काढलेला कांदा बाजारात विकावा लागत आहे. म्हणजेच एकीकडे कमालीचे घसरलेले कांद्याचे भाव आणि दुसरीकडे उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ यामुळे हे कांदा पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
हळवा म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात लागवड झालेल्या कांदा काढणीला सध्या वेग आला आहे. या कांद्याची जास्त काळ साठवणूक करता येत नाही. त्यामुळे इतर खर्च वाढायला नको म्हणून शेतकरी हा कांदा काढल्यावर लगेच बाजारात विकण्यास प्राधान्य देतात. मात्र सध्या बाजारात कांद्याचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे सध्या हे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
गेल्या चार महिन्यांत कांदा पिकांसाठीची कीटकनाशके, बुरशीनाशके तसेच बियाणे यांच्या किंमत ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. रासायनिक खतांच्या किंमत प्रतिबॅग २०० ते ४०० रुपयांनी वाढल्या आहेत. कांदा पिशवीच्या दरात १५ ते २५ रुपयांनी वाढ झालेली आहे. तसेच कांदा काढण्याची मजुरी आणि वाहतूक खर्चही वाढलेला आहे. या परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कांदा बाजारभावात सतत घसरण होत आहे. भविष्यात कांदा उत्पादन घ्यायचे की नाही? शासनाने कांदा उत्पादक शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कांदा बाजारभावाबाबत योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे.
-दादा पवार,
अध्यक्ष, नवविकास युवक शेतकरी संघटना
01248