मालाड - मालवणीतील मार्वे रोडवर आज दुपारी घडलेल्या धक्कादायक अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. अनधिकृतपणे रस्त्यावर उभी असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसच्या लगेजच्या झाकणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच ४७ - J १८२१ वरून एक तरुण मालाडच्या दिशेने जात होता. मालवणीतील मार्वे रोडवर अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर अनधिकृतरीत्या उभी असलेल्या ‘माँ ट्रॅव्हल्स’च्या बसचे लगेजचे झाकण क्लिनरने अचानक उघडले. त्याचवेळी मागून येणारी दुचाकी त्या उघड्या झाकणाला जोरात आदळली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मान गंभीररीत्या जखमी होऊन कापला गेला.
अपघातानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणाला तत्काळ रिक्षामधून कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून तो मुस्लिम समाजातील असून उपवास करत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.