स्थायी समिती सदस्यांची नावे लांबणीवर
esakal February 25, 2026 09:45 AM

स्थायी समिती सदस्यांची नावे लांबणीवर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २४) पार पडली. या सभेत स्थायी समिती सदस्यांसह सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांची घोषणा होणार होती. त्यानुसार सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, शिंदे सेनेत स्थायी समिती मिळावी यासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये पहिला मान कोणाला दिला जावा यावर एकमत न झाल्यानेच स्थायी समिती सदस्यांची नावे लांबणीवर पडल्याचे दिसून आले.
ठाणे महापालिकेत शिंदे गटाने एकहाती सत्ता संपादित केली आहे. त्यानुसार स्थायी समितीमध्येदेखील शिंदे गटाचे अधिक नगरसेवक सदस्य म्हणून जाणार आहेत. त्यानुसार स्थायी समितीमध्ये शिंदे गटाचे नऊ, भाजप तीन, शरद पवार गट एक, राष्ट्रवादी एक, एमआयएम एक आणि एक सदस्य हा भाजप किंवा शरद पवार गटाचा जाणार आहे. याचे गणितदेखील सोमवारी महासभेत निश्चित होणार होते. त्यानुसार सोमवारी महासभा सुरू होताच स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रशासनाने हा विषय ऐन वेळेस मागे घेतल्याचे जाहीर केले.
शिंदे गटाकडून महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार महापौर, गटनेते आणि आता सभागृह नेतेपदीदेखील शिंदे यांनी त्यानुसार निवड केली आहे. परंतु आता स्थायी समिती सदस्यांमध्येदेखील अशाच पद्धतीने काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. शिंदे सेनेकडून नऊ नावे जाणार आहेत. परंतु त्या नावांवर अद्याप एकमत न झाल्याने ही निवड प्रक्रिया लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सेनेतून स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. एकाच वेळेस सर्वांना सामावून घेणे शक्य नसल्याने आलेल्या नावांपैकी कोणाच्या नावांवर एकमत होणार, हे आता येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. किंबहुना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नावे अंतिम न झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळेच सोमवारी होणारी नियुक्तीचा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.