''गणपत वाणी'' काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण
esakal February 25, 2026 09:45 AM

‘गणपत वाणी’ काव्यलेखन
स्पर्धेचे पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा चिपळूण आयोजित राज्यस्तरीय समस्यापूर्ती ‘गणपत वाणी’ काव्यलेखन स्पर्धेचे नुकतेच पारितोषिक वितरण झाले. ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पारितोषिक वितरणावेळी एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते. सुरुवातीला स्व. अप्पा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी हेमंत भागवत यांनी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयालाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने चिपळूणचे नाव जगभर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. यतीन जाधव यांनी मराठी भाषेबद्दल असणारे प्रेम आणि इतर देशांतील मराठी भाषिकांनी दिलेला चांगला प्रतिसाद याबद्दल आनंद व्यक्त केला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ‘लोटिस्मा’च्या प्रांगणात झाला, याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. ही स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य आणि ‘मसाप’ चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोणबरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. जगभरातील साडेपाचशेहून अधिक स्पर्धकांचा मिळालेला प्रतिसाद संस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षण करताना पारदर्शकपणे उपयोजिलेली कविता कोडिंगची पद्धत, सात दर्दी काव्य परीक्षकांचे सहकार्य, स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांविषयीची कृतज्ञता आदींचे विवेचन त्यांनी केले.
या प्रसंगी ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, ‘आपलं चिपळूण’संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रवींद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदी उपस्थित होते.
---

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.