Hollywood: हॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेते मार्टिन शॉर्ट यांची मोठी मुलगी कॅथरीन शॉर्ट हिचा वयाच्या 42व्या वर्षी मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कॅथरीनने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर शॉर्ट कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी लॉस एंजलिस पोलीस डिपार्टमेंटला कॉल आला होता. पोलिस आणि आपत्कालीन सेवा सायंकाळी सुमारे 6.40 वाजता कॅथरीनच्या हॉलीवूड हिल्स येथील घरी पोहोचले. तेथे ती मृत अवस्थेत आढळली. मृत्यूचे कारण स्वतःवर झाडलेली गोळी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अधिकृत चौकशी सुरू आहे.
कॅथरीनच्या निधनामुळे मार्टिन शॉर्ट यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच त्यांची जवळची मैत्रीण कॅथरीन हिचे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. शॉर्ट कुटुुंबाच्या प्रतिनिधींनी एक निवेदन जारी करत कॅथरींचा निधनाची दुःखद बातमी दिली. कॅथरीनच्या निधनाने आम्हाला खूप दुःख होत आहे. शॉर्ट कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कॅथरीन सर्वांना प्रिय होती आणि तिने या जगात आणलेल्या आनंदी भावनेसाठी ती नेहमीच लक्षात ठेवली जाईल. या कठीण काळात तुम्ही सर्वांनी गोपनीयता राखावी, कुटुंबाला सावरण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती केलीये.
कॅथरीन ही मार्टिन शॉर्ट आणि त्यांच्या दिवंगत पत्नी नॅन्सी डोलमन यांची मोठी मुलगी होती. नॅन्सी यांचे 2010 मध्ये अंडाशयाच्या कर्करोगाने निधन झाले होते. कॅथरीन नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिली. ती क्वचितच वडिलांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांना दिसायची.
कॅथरीनने वडिलांसारखी मनोरंजनसृष्टीची वाट न निवडता समाजसेवेचं क्षेत्र गाठलं होतं. ती मानसिक आरोग्याशी संबंधित काम करत होती. तिच्या नावाने एक स्वतंत्र क्लिनिक सुरू होतं, तसेच तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञांच्या टीमसोबतही ती अर्धवेळ काम करत होती. लोकांना मानसिक स्वास्थ्याबद्दल मार्गदर्शन करणारी कॅथरीननेच आयुष्य संपवल्याची बातमी समोर आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. मात्र तिनं असा निर्णय का घेतला, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कॅथरीन शॉर्टचे वडील मार्टिन शॉर्ट हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेते, लेखक आणि होस्ट आहेत. आपल्या खास कॉमिक टायमिंगमुळे त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मार्टिन शॉर्ट यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात Three Amigos, Father of the Bride, Mars Attacks! यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच सध्या ते लोकप्रिय मालिका ओन्ली मर्डर इन द बिल्डींगमधील भूमिकेमुळेही चर्चेत आहेत.
मार्टिन शॉर्ट सध्या स्टीव मार्टिन यांच्यासोबत मिलवॉकी आणि मिनियापोलिस येथे लाईव्ह शोसाठी जाणार होते. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर हे कार्यक्रम होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.दरम्यान, कुटुंबाने गोपनीयतेची विनंती केली असून चाहत्यांकडून शोकसंदेशांचा ओघ सुरू आहे.