विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अडकले विवाहबंधनात, उदयपूरमध्ये रंगला शाही सोहळा
Marathi February 26, 2026 03:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साऊथ सिनेसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर गुरुवारी विवाहबंधनात अडकले आहेत. उदयपूरमधील निसर्गरम्य अरावली पर्वत रांगांमध्ये असलेल्या ‘आयटीसी हॉटेल्स द मोमेंटोस’मध्ये हा भव्य विवाहसोहळा पार पडला. सकाळी हिंदू परंपरेनुसार आणि वैदिक मंत्रोच्चारात या दोघांनी एकमेकांचा जोडीदार म्हणून स्वीकार केला. यावेळी जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत विजयने रश्मिकाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. विशेष म्हणजे, रश्मिकाच्या कोडाव परंपरेचा मान राखण्यासाठी दुपारी 4.30 वाजता ही जोडी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे.

‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विजय आणि रश्मिका यांची पहिली भेट झाली होती. याच काळात त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते, मात्र त्यांनी आपल्या नात्याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. अखेर विजयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या लग्नाला ‘वेडिंग ऑफ VIROSH’ असे नाव दिले असून, लग्नाआधीच्या हळद आणि मेहेंदीचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

रश्मिकाचे सासरे गोवर्धन राव देवरकोंडा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या टीव्ही शोजचे दिग्दर्शन केले असून 2021 मध्ये विजयच्या ‘पुष्पक विमानम’ या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. विजयची आई माधवी देवरकोंडा या गृहिणी असून त्या सोशल मीडियावर आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत सक्रिय असतात. सध्या सोशल मीडियावर या नवदाम्पत्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.