माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख रुपये कसे आले? विद्यार्थीनीची पोलीस ठाण्यात धाव, मनसेची प्रकरणात उडी
सुरेश काटे February 26, 2026 07:13 PM

Dombivli Crime News : उत्तराखंडमधील लोकांना फसवून माझ्या अकाऊंटचा वापर करत 2 कोटी 60 लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आले आहे. याची तक्रार करुन देखील पोलिस गंभीर दखल घेत नाहीत, असा सवाल डोंबिवलीतील विद्यार्थीनी निधी तिवारी हीने केला आहे. माझ्या अकाऊंटमध्ये 2 कोटी 60 लाख रुपये कसे आले? याचा तपास करा अशी मागणी विद्यार्थ्यीनीने पोलिसांकडे केली आहे. आता या प्रकरणात मनसेने देखील उडी घेतली आहे. इतकेच नाही तर सायबर फसवणूकीबद्दल मुख्यमंत्र्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या. डोंबिवलीतील एका तरुणीसोबत अशा प्रकारची फसवणूक होते. पोलिस गंभीर दखल घेत नाहीत याचा अर्थ काय? असा संतप्त सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. 

तीन ठिकाणी अकाऊंट उघडले होते

डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात निधी तिवारी ही विद्यार्थिनी राहते. ती कल्याणमधी एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची एक मैत्रीण आहे. तिचे नाव चांदनी सिंह असे आहे. ती आरबीएल बँकेत कामाला आहे. तिने निधीचे अकाऊंट उघडले. यासाठी तिने निधीला काही पैसे दिले. मला अकाऊंट उघडण्याचे टारगेट दिले आहे असे तिने अकाऊंट उघडवताना सांगितले होते. काही दिवसांनी धक्कादायक बाब समोर आली. निधीच्या अकाऊंटमध्ये 2 कोटी 60 लाख रुपयांचे ट्राझेक्शन झाले आहे.  तिने केवळ एकच अकाऊंट उघडले नव्हते. तर तीन ठिकाणी अकाऊंट उघडले होते. अन्य एका अकाऊंटमध्ये 10 लाख रुपयांचे ट्रांझेक्शन झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात निधीने चांदणी हिला विचारले. तेव्हा तिने टाळाटाळ केली. निधीने चौकशी केली तेव्हा तिला माहिती पडले की, उत्तराखंडातील नागरीकांची फसवणूक करुन ते पैसे निधीच्या अकाऊंटमध्ये टाकले होते. त्या खात्यातून व्यवहार केला गेला. 

या प्रकरणात उल्हासनगरातील एक व्यक्ती सामिल

दरम्यान, या प्रकरणात उल्हासनगरातील एक व्यक्ती सामिल आहे. त्याची माहिती देखील निधीने पोलिसांना दिली होती. गेल्या 3 महिन्यापासून निधी पोलिसांकडे दाद मागत आहे. पोलिस ठोस कारवाई करत नसल्याने निधीने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. मनसेने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. जाधव यांचा स्पष्ट आरोप आहे की, मुख्यमंत्र्यांनी सायबर क्राईम रोखण्यासठी काही माहिती दिली. परंतू डोंबिवलीतील एका विद्यार्थींनी सोबत गंभीर गुन्हा घडला आहे. उत्तराखंडातील नागरीकांना फसविले गेले आहे. तरी  पोलिस दाद देत नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही तरुणी तक्रारदार होऊ शकत नाही. मात्र या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बोलावून घेतले होते. मग कारवाई का केली नाही. त्याला असे कसे सोडून दिले. त्या संशयितांना सोडून दिल्याने या प्रकरणाचा छडा कसा लागणार? या तरुणीला आणि फसवणूक झालेल्यांना न्याय कसा मिळणार? आदी प्रश्न जाधव यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, पोलीस या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणात तरुणीचा अर्ज आला आहे. चौकशी सुरु आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.