Shrirampur Accident:कुटुंबावर काळाचा घाला! कार अन् ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू; दोन चिमुरड्यांसह तिघे गंभीर, श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील घटना..
esakal February 26, 2026 10:46 PM

श्रीरामपूर: तालुक्यातील खंडाळा येथे गणपती दर्शनासाठी निघालेल्या चव्हाण कुटुंबाच्या आनंदावर काळाने विरजण घातले. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील एस.टी. कार्यशाळेजवळ बुधवारी (ता.२५) दुपारच्या सुमारास कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात शहरातील प्रसिद्ध ‘संतोषी वडापाव’चे संचालक अशोक व रमेश चव्हाण यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन चिमुरड्यांसह एका महिलेची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

Satara News: पाचगणीत ‘ईडी’ची कारवाई! मनी लाँडरिंगप्रकरणी जुनैद मेमन यांच्या तीन मिळकती ताब्यात; गुप्तता अन् माहिती देण्यास टाळाटाळ!

प्रशांत रमेश चव्हाण (वय २४), ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय २६) व सिद्धार्थ सुनील चव्हाण (वय १६) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर सर्व जखमींना साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले होते. ऐश्वर्या चव्हाण वगळता इतरांना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना संगीता अनिल चव्हाण (वय ४०) यांचाही मृत्यू झाला, तर सारिका अनिल चव्हाण (वय ३०), रुद्र (वय ६) व ऋत्वी अशोक चव्हाण (वय ३.५ वर्षे) हे तिघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

चव्हाण कुटुंबीय दुपारी सव्वा चारच्या सुमारास श्रीरामपूरहून खंडाळा येथे दर्शनासाठी कारने (एमएच ०३, एएफ ००५४) निघाले होते. एस. टी. कार्यशाळेजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला (एचआर ६७, ई ३००२) कारने जोरदार धडक झाली. धडकेत कारचा समोरचा भाग चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले. ११२ क्रमांकावरून पोलिसांनी माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक जयदत्त भवर, निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

Organ Donation:वडिलांच्या दातृत्वामुळे मुलाला नवजीवन;मूत्रपिंड प्रत्यारोपण, ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी, कुटुंबियाच्या डाेळ्यात पाणी! दहा दिवसांपूर्वीच कारची खरेदी

मयत प्रशांत चव्हाण यांनी अवघ्या दहा दिवसांपूर्वीच कार खरेदी केली होती. नवीन कारने देवाच्या दर्शनाला जात असतानाच हा अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहर पोलिसांनी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.