शाहरूख खानचा पहिला सिनेमा जो तुम्ही पाहिला नसेल, ज्याची प्रिंट झाली होती खराब
BBC Marathi February 26, 2026 10:46 PM
The Film Heritage Foundation शाहरूख खान

शाहरूखला भलेही आपण 'किंग ऑफ रोमान्स' म्हणत असू...पण शाहरुखने करिअरच्या सुरूवातीला खूप वेगवेगळे रोल केले आहेत. आपल्याला बाजीगर किंवा डर मधले निगेटिव्ह रोल्स आठवतील. राजू बन गया जंटलमनमधली काहीशी ग्रे शेड असलेली भूमिका आठवते.

पण त्या आधीही शाहरूखने एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमात काम केलं होतं...या फिल्ममध्ये त्याच्यासोबत होत्या बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय आणि मनोज वाजपेयी.

हा सिनेमा कोणता आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...या सिनेमाचं नाव आहे 'इन विच ॲनी गिव्ह्ज इट दोज वन्स' (In Which Annie Gives It Those Ones). 1989 साली आलेल्या या सिनेमात शाहरूख खान एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत होता. हा त्याचा पहिला सिनेमा होता.

या सिनेमाला त्यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते...पण हा पुरस्कार शाहरुखला नाही; तर अरुंधती रॉय यांना मिळाला होता. सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले (पटकथा लिखाणासाठी) साठी अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार मिळाला होता. महत्त्वाचं म्हणजे अरुंधती रॉय यांची या सिनेमात भूमिकाही होती.

ही फिल्म अरुंधती रॉय यांची 'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' हे कादंबरी प्रसिद्ध होण्याच्या आठ वर्षं आधी जानेवारी 1989 साली रिलीज झाली होती.

नुकतेच बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही या सिनेमाची स्क्रिनिंग होणार होती. पण अरुंधती रॉय यांनी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हायला नकार दिला.

त्यांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे नकार दिला होता, हे जाणून घेऊयातच...पण आधी या सिनेमाबद्दल जाणून घेऊ.

शाहरूखच्या करिअरमधली पहिली फिचर फिल्म

दिल्लीमधल्या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या आय़ुष्यावर आधारलेली ही फिल्म होती.

अरुंधती रॉय यांनी त्यांच्या 'मदर मेरी कम्स टू मी' या आत्मचरित्रात या सिनेमाबद्दल लिहिलं आहे. पण त्यांनी शाहरूख खानचा उल्लेख केला नाहीय.

अरुंधती रॉय यांनी लिहिलं आहे, "आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. ॲनीची भूमिका अर्जुन रैना याने केली होती. आम्ही 'बरगत' नावाच्या टीव्ही सीरियलमध्ये एकत्र काम केलं होतं. त्याच्याशी आमची चांगली मैत्री झाली होती. दुसऱ्या एका महत्त्वाच्या भूमिकेत रोशन सेठ होते. रिचर्ड अटेंबरो यांच्या 'गांधी' सिनेमात साकारलेल्या नेहरूंच्या भूमिकेमुळे रोशन सेठ प्रसिद्ध झाले होते. मी या सिनेमात राधा नावाच्या विद्यार्थिनीची भूमिका केली होती."

शाहरूखने या सिनेमात एका विद्यार्थ्याचं काम केलं होतं, ज्याचं नाव असतं 'सीनिअर.'

हा शाहरूखचा पहिलाच सिनेमा असल्याचं सांगितलं जातं. कारण त्याआधी शाहरूख मालिकांमधूनच काम करत होता.

Getty Images शाहरुख खान आणि अरुंधती रॉय

या सिनेमासाठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराने अरुंधती रॉय यांना त्यांची ओळख मिळवून द्यायला मदत केली.

आपल्या आत्मचरित्रात रॉय यांनी राष्ट्रीय पुरस्कारांच्या वेळेचाही एक किस्सा लिहिला आहे. पुरस्कार समारंभासाठी अरुंधती रॉय या साध्या, नेहमीच्या कपड्यांतच गेल्या होत्या. पण बाकी लोक फॉर्मल कपड्यांमध्ये आले होते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉय यांना अशा कपड्यांमध्ये पाहून रागाने म्हटलं की, हा ड्रेस कोड पुढच्या वर्षी लागू होईल.

रॉय यांनीही प्रत्युत्तर देत म्हटलं, "ओके, पण मी पुढच्या वर्षी इथे नसेन!"

नोव्हेंबर 2015 मध्ये देशात धार्मिक विद्वेषाच्या घटना वाढत असताना अनेक क्षेत्रातील लोकांनी सरकारी पुरस्कार परत करण्याची मोहीम सुरू केली होती. याच वेळी अरुंधती रॉय यांनीही आपला राष्ट्रीय पुरस्कार परत केला होता.

त्याचवर्षी एका मुलाखतीत शाहरुख खानने देशातील 'वाढत्या असहिष्णुते'बद्दल आपलं मत मांडलं होतं.

त्याने म्हटलं होतं, "इथे असहिष्णुता आहे...प्रचंड असहिष्णुता. मला वाटतंय की असहिष्णुता वाढत चाललीये. जे याचा निषेध करत आहेत आणि पुरस्कार परत करत आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे."

The Film Heritage Foundation अरुंधती रॉय खराब झालेली सिनेमाची प्रिंट आणि रिस्टोरेशन

देशातली सरकारी दूरचित्रवाणी वाहिनी दूरदर्शनवर फक्त एकदाच प्रसारित झाल्यानंतर या चित्रपटाची प्रिंट खराब झाली होती. अलीकडेच 'फिल्म हेरिटेज फाउंडेशन' नावाच्या संस्थेने ही प्रिंट दुरूस्त करण्याचं काम हाती घेतलं.

या सिनेमाच्या प्रिंटच्या रिस्टोरेशनची सुरूवात अपघातानेच झाली. घर बदलत असताना चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप कृष्णा यांना एका बॅगेत सिनेमाची स्क्रिप्ट आणि कागदपत्रं सापडली.

ते ती फेकून देणार होते, पण एका मित्राने ही माहिती फिल्म हेरिटेज फाउंडेशनचे संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांना दिली आणि त्यांनी चित्रपटाची प्रिंट रिस्टोअर करण्याचा सल्ला दिला.

The Film Heritage Foundation 'इन विच ॲनी गिव्ह्ज इट दोज वन्स' सिनेमातलं दृश्य

सिनेमाची प्रिंट रिस्टोअर करणं म्हणजे फॉरेन्सिक तपासासारखंच कठीण काम होतं. रंग जवळजवळ नाहीसे झाले होते, तर साउंडट्रॅक पुन्हा तयार करणंही अत्यंत अवघड होते.

शिवेंद्रसिंह डुंगरपूर सांगतात की, "चित्रपटाच्या शेवटी एक प्रसंग आहे ज्यात अरुंधती रॉयने लाल साडी घातलेली दिसते. पण आम्हाला मिळालेल्या प्रिंटमध्ये तो रंग पूर्णपणे गायब होता. त्यामुळे तो नेमका कोणत्या छटेचा लाल होता हे पण विचारावं लागलं."

फिल्म हेरिटेज फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट मार्च महिन्यात रिलीज केला जाणार आहे.

बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हायला नकार का?

अरुंधती रॉय यांनी अलीकडेच जर्मनीची राजधानी बर्लिन इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी व्हायला नकार दिला होता.

या महोत्सवात 'इन विच ॲनी गिव्ह्ज इट दोज वन्स' हा सिनेमा 'क्लासिक्स' विभागात प्रदर्शनासाठी निवडण्यात आला होता.

या फेस्टिव्हलमधील प्रमुख ज्युरी विम व्हेंडर्स यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अरुंधती यांनी महोत्सवाला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला.

पत्रकार परिषदेत विम व्हेंडर्स यांना विचारण्यात आलं होतं की, इराण आणि युक्रेनच्या मुद्द्यांवर समर्थन व्यक्त केलं जातं, पण पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर का नाही?

त्याला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, आपण राजकारणापासून राजकारणापासून दूर राहायला हवे.

अरुंधती रॉय यांनी व्हेंडर्स यांचं वक्तव्यं 'धक्कादायक' आणि 'निराशाजनक' असल्याचं म्हटलं. त्यांनी म्हटलं की, अशा काळात कलाकार, लेखक आणि चित्रपट निर्मात्यांनी शांत राहू नये. ही त्यांची जबाबदारी आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • शाहरुख खान : 'बाजीगर'पासून ते 'जवान'पर्यंत, अँटी हिरो ते सुपरस्टार होण्याची गोष्ट
  • जवान : शाहरूख म्हणतोय, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’
  • शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये झाला सामील; भारतीयांपैकी आणखी कोण आहे यादीत?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.