काही सुखद---लोगो
- rat२६p३.jpg-
२६O२७३१५
अशोक लोटणकर.
- rat२६p५.jpg
२६O२७३१६
साखरपा : येथील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साहित्यिक अशोक लोटणकर.
-------
शालेय विद्यार्थ्यांच्यात साहित्यप्रेम जागवण्याचा संकल्प
अशोक लोटणकर यांचे प्रयत्न ; साखरप्यातील दुर्गम शाळेत संवाद उपक्रम
अमित पंडित : सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २६ : मराठी भाषा गौरव दिन हा वर्षातील केवळ एक दिवस साहित्य प्रचाराचा नाही तर तो एक प्रतीक आहे, वर्षभर घडत राहणाऱ्या एका चळवळीचा. अशीच साहित्य प्रचाराची एक चळवळ गेले काही महिने हाती घेतली आहे ती कवी अशोक लोटणकर यांनी. साखरपा परिसरातील दुर्गम भागातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी साहित्यावर संवाद साधत आहेत.
साहित्यिक अशोक लोटणकर हे मूळचे साखरपा गावाजवळच्या जाधववाडी येथील. शालेय शिक्षण रयत शिक्षणसंस्थेत आणि नंतर देवरूखच्या मातृमंदिर संस्थेत राहून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. छंद म्हणून त्यांनी लेखनकला जोपासताना आधी ग्रामीण कथा आणि त्यानंतर काव्य हे साहित्यप्रकार हाताळले. त्यानंतर नोकरीनिमित्त चार दशके मुंबईला वास्तव्य केले; मात्र त्यांचे साखरपा आणि पर्यायाने कोकणाशी असलेले ऋणानुबंध तुटले नाहीत. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन व्यतीत करत असताता लोटणकर पुन्हा आपल्या मूळ मातीत म्हणजेच कोकणात परत आले; पण केवळ परत येऊन ते थांबले नाहीत तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी ते गेले वर्षभर प्रयत्नशील आहेत.
साखरपा परिसरातील दुर्गम भागातील काही शाळा त्यांनी निवडल्या आहेत. त्या शाळांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांशी साहित्यावर संवाद साधतात. अर्थात, त्यांच्या संवादाचा प्रमुख कणा हा बालसाहित्य हाच असतो. विद्यार्थ्यांना बालसाहित्याची पुस्तके विनामूल्य देणे, त्यांना साहित्यवाचन करून दाखवणे, त्यांच्याकडून कविता वाचन करून घेणे, असे उपक्रम ते राबवतात. विद्यार्थ्यांना साहित्याची, वाचनाची गोडी लागावी यासाठी ते हा उपक्रम करतात. त्याचबरोबर काव्यवाचन ही कला विद्यार्थ्यांमध्ये रूजावी, हा हेतू असतोच.
आजवर साखरपा परिसरातील सहा शाळांमधून त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. पूर्येतर्फे देवळे शाळा, पुर्ये क्र.२ शाळा,भडकंबा नवालेवाडी शाळा, पाष्टेवाडी शाळा, अत्यंत दुर्गम आणि विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या देवडे गावातील देवडे क्र.२, लांजा तालुक्यातील दुर्गम भागातील माचाळ येथील शाळांमध्ये अशोक लोटणकर यांनी हा उपक्रम राबवला आहे. यापुढेही असेच उपक्रम अन्यही शाळेत राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
----
दृष्टिक्षेपात
* शालेय जीवनापासून साहित्यनिर्मिती
* ग्रामीण साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
* दुर्गम भागातील शाळांमधून साहित्य प्रचार
* कथा आणि काव्यवाचनाचे प्रयोग
* विद्यार्थ्यांना बालसाहित्याच्या पुस्तकांचे मोफत वाटप
---------
कोट
केवळ एक दिवस साजरा करून मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होणार नाही. त्यासाठी बालवाचक तयार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण झाली तरच उद्याचे साहित्यिक तयार होतील
- अशोक लोटणकर,साहित्यिक