Aaditya Thackeray : या कारणावरुन आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मतभेद का?
Tv9 Marathi February 27, 2026 02:45 PM

देशभरात राज्यसभेच्या 36 जागा रिक्त होत आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात जागा आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील पाटील हे निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये आहेत. भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांचाही कार्यकाळ संपणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून खासदार शरद पवार आणि फौजिया खान हे निवृत्त होतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील हे देखील निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये आहेत. आता या सात जागांपैकी महाराष्ट्र विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहिलं तर महायुती 6 खासदार निवडून आणू शकते. महाविकास आघाडीकडे एक खासदार निवडून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला एक जागा येईल.

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांच्या आमदारांची मिळून 240 पेक्षा जास्त संख्या आहे. तेच महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. यात उद्धव ठाकरे गटाचे 20, काँग्रेस 16 आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत. आता राज्यसभेच्या या एकाजागेवरुन महाविकास आघाडीत मतभेद दिसू लागले आहेत. “राज्यसभेसाठी मोठं नावं आलं तर यावेळी आमची जागा जाईल. रोटेशननुसार काँग्रेस पुढच्यावेळी जागेची मागणी करेल. देश पातळीवर शिवसेनेचा आवाज महत्वाचा आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा एकावाक्यता नाहीय

“मोठी नावं चर्चेत आली तर मग यावेळी आमची संधी जाईल. काँग्रेस पुढच्यावेळी कोणीतरी आणेल. हे कुठेही न बिघडवता आमच्या दोन सीटस द्या. शिवसेनेचा आवाज देशपातळीवर महत्वाचा आहे. कोणी कमी लेखण्याचं कारण नाही. आमची साथ सोबत त्यांना आहेच. आमच्या खासदारांची उपस्थिती बघा, भाषणं बघा, काढा रेकॉर्ड” असं आदित्य ठाकरे म्हणाले. आता आदित्य ठाकरे म्हणतात आमची जागा जाईल, दुसरीकडे संजय राऊत म्हणतात आम्ही राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ याचा अर्थ महाविकास आघाडीत राज्यसभेच्या एकाजागेवरुन मतभेद आहेतच पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा एकावाक्यता नाहीय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.