लकी ड्रॉमध्ये कार जिंकणं सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना भोवलं; नागरी सेवा नियमांचा भंग केल्याचा ठपका, गोंदियाच्या दिशा पाजाईंवर निलंबनाची कारवाई
देवेंद्र रहांगडाले February 28, 2026 02:43 PM

Gondia News : शासनाची पूर्वपरवानगी न घेता लकी ड्रॉमध्ये सहभाग घेत चारचाकी वाहन जिंकणे गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना (परिविक्षाधीन) चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1971 च्या नियम 12, 13 व 19 चा भंग केल्याच्या कारणावरून राज्याचे प्रधान सचिव आणि विधि परामर्शी यांनी गोंदियाच्या (Gondia News) सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिशा पजई (Disha Pajai) यांच्यावर विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करत निलंबनाची कारवाई केली आहे.

Gondia News : शासनाची पूर्वपरवानगी न घेता आयोजित लकी ड्रॉ योजनेत सहभाग, शिस्तभंगाची कार्यवाही

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्स तर्फे सोने खरेदीवर 'लकी ड्रॉ' योजना आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त (परिविक्षाधीन) दिशा पजई यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता आयोजित लकी ड्रॉ योजनेत सहभाग घेतला. योजनेनुसार लकी ड्रॉमध्ये चार चाकी वाहन जिंकले व ज्वेलर्स तर्फे गोंदिया येथे नवीन प्रतिष्ठानच्या उद्घाटनाप्रसंगी सदर चारचाकी वाहनाचा स्विकारही केला. यावर राज्याचे प्रधान सचिव व विधि परामर्शी दिलीप शिवाजीराव घुमरे यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 च्या नियम 4 च्या पोटनियम (एक) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन पजई यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करुन त्यांना निलंबित केले. त्याचबरोबर हे आदेश अंमलात असेपर्यंतच्या कालावधीत त्यांना गोंदिया येथे मुख्यालय देण्यात आले असून निम्न स्वाक्षरीत व्यक्तीच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशीत करण्यात आले आहे.

Gondia News : नागरी सेवा नियमाचा भंग केल्याचा ठपका, प्रशासनावरच्या विश्वासाला तडा?

लोकसेवक जर अशा पद्धतीने संस्थांकडून बक्षीस घेत असतील तर जनतेच्या प्रशासनावरच्या विश्वासाला तडा जातो. अशी प्रतिक्रिया सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची तक्रार करणारे यशवंत मानकर यांनी दिली आहे. गोंदियाच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या निधी व न्याय विभागाने ही कारवाई केली आहे. लकी ड्रॉमध्ये चार चाकी वाहन मिळवून महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून याची तक्रार करणारे यशवंत मानकर यांनी लोकसेवक अशा पद्धतीने संस्थांकडून बक्षीस घेत असतील तर जनतेच्या प्रशासनावरच्या विश्वासाला तडा जातो, अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. तर या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिशा पजई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या तरी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.

विस्तृप्त चौकशी व्हायला पाहिजे

सहायक धर्मदाय आयुक्त यांनी बक्षीसामध्ये मोटर वाहन स्वीकारणे हे विश्वासाला तडा जाणार आहे. लोकसेवक संस्थांकडून बक्षीस स्वीकारत असतील तर जनतेच्या प्रशासनावरच्या विश्वासाला तडा जातो. याच्यामध्ये आणखी विस्तृप्त चौकशी व्हायला पाहिजे, जेणेकरून काही तथ्य असतील तर ते उलगडले जातील. प्रशासनिक कारभारातील हे गैरकृत्य असून त्याच्यामुळे ही कारवाई झालेली आहे. असेही यशवंत मानकर म्हणाले.

 इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.