Shaktipith Highway Protest : 'एक इंचही जमीन देणार नाही'; वाळव्यात शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध, ईश्वरपुरात मोर्चा
esakal February 28, 2026 02:45 PM

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध (Shaktipith Highway protest) करण्यासाठी शेतकरी, सामाजिक संघटना, तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. क्रांतिकारकांचे रक्त सांडलेल्या या भूमीत कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी एक इंचही जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

क्रांतिसिंहांचे दर्शन घेऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. खासदार राजू शेट्टी, डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, शहाजी पाटील, संग्राम फडतरे, शशिकांत पाटील, सुस्मिता जाधव, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) अभिजित पाटील आदींसह शक्तिपीठ विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा आहे. तुमचे रक्त जोपर्यंत खवळत नाही, तोपर्यंत सरकार आपले ऐकणार नाही. दोन-चारशे लोकांच्या मोर्चाने हा निर्णय बदलणार नाही. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागेल. शेतजमिनी मोजण्यासाठी येणाऱ्यांविषयी सरकारला भीती वाटेल, एवढा मोठा उठाव उभारला पाहिजे. ज्या भागात तीव्र विरोध झाला, तेथून हा मार्ग रद्द करण्यात आला आणि तो वाळवा तालुक्याकडे वळवण्यात आला आहे. वाळवा तालुक्यातील शेतकरी मवाळ आहेत, असा सरकारचा समज आहे. तो चुकीचा असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली आहे.’

खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘प्रत्येकाला आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. शक्तिपीठसाठी कोणी शेतजमिनीची मोजणी करायला आल्यास त्याला ठाम विरोध करा. इतर ठिकाणी मोजणी झालेली नसताना वाळवा तालुक्यातही ती होऊ देऊ नका. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटी रुपयांची तरतूद करून हा मार्ग पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. पलूसहून वाळवा तालुक्यात येताना या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकावा लागणार आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना कंपाउंड असणार असून शेतकऱ्यांना त्याचा कोणताही प्रत्यक्ष फायदा होणार नाही. उलट रस्त्याची उंची वाढल्याने शेतात पाणी साचून शेतीचे मोठे नुकसान होईल.’

Snake in Grapes Farm Sangli : शेतकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला! द्राक्ष वेलीवर वेटोळे घालून बसलेल्या नागाला पाहून काळजाचं पाणी झालं; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ..

शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील म्हणाले, ‘वाळवा तालुक्यातील सुपीक जमीन नापीक करण्याचा हा डाव आहे. साखर उद्योग व सहकारी संस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या महामार्गामागे आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील प्रत्येक इंच जमीन सिंचनाखाली आणण्यात आली आहे. संपूर्ण तालुका बागायती झाला आहे. मात्र, हा मार्ग वळवून शेतीचे नुकसान करण्याचा घाट घातला जात आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी मार्ग रद्द करण्याचे ठराव दिले आहेत. तरीही दबाव टाकून हा मार्ग राबविण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करतील.’

यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संघर्ष समितीतर्फे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याबाबतचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले.

घोषणांनी परिसर दुमदुमला

‘शेतकरी बचाव, शक्तिपीठ हटाव’, ‘शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे’, ‘एकच जिद्द – शक्तिपीठ महामार्ग रद्द’, ‘बांधाच्या पाणंदीचे रस्ते नीट करा; कशाला पाहिजे शक्तिपीठ?’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या मोर्चात महिला शेतकऱ्यांचाही लक्षणीय सहभाग होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.