- अर्चना फाटे
मोताळा - शनिवारी एकुलत्या एक मुलाचे नानमुख.. घरावर स्वतः विद्युत रोषणाई केली. दुपारी मेहंदीची गडबड.. चार वाजता महिलांना बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाची लगबग आणि अचानक घरातून रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज आला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वर पित्याचा मृत्यू झाला आणि अचानक आनंदाचे वातावरण दुःखात परावर्तित झाले. हा हृदयद्रावक प्रसंग घडला शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील सर्वेश्वर नगरात.
मूळ गाव आडविहिर येथील अशोक सरकाटे (ह. मु. प्रभाग १५, सर्वेश्वर नगर ) यांच्या एकुलता एक मुलगा अमर याचा शुभ विवाह खामगाव तालुक्यातील आमसरी, हल्ली मुक्काम आयआयटी पवई मुंबई येथील डॉ. रवींद्र गवई यांची मुलगी कीर्ती हीच्याशी रविवारी (ता. २९) पार पडणार होता. अशोक सरकाटे यांनी अनेक वर्ष सैन्यात देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले होते.
त्यानंतर बुलढाणा येथे एचडीएफसी बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले. ते उत्कृष्ट शेतकरीही होते. रविवारी मुलाचे लग्न म्हणून धावपळ सुरू होती. बस्ता, सोने, किराणा, टेन्ट, सर्व काही बुक झाले होते. शनिवारला राहिलेले सर्व कामे आटोपण्याची वर पित्याची गडबड. नगर पंचायतीने नाली सफाई केलेली नव्हती त्यामुळे स्वतः सफाई केली.
घरासमोर माती टाकून रस्त्याची लेव्हल केली. संध्याकाळी कॉलनीतील धावणारी तरुणाई व नागरिकांसाठी मिरचीची भाजीची योजना आखली. मुलाच नानमुख व लग्नाचे सर्व कामे पूर्ण झाले. दुपारला अशोक सरकाटे यांनी जेवण केले. थोडी विश्रांती घेण्यासाठी मागच्या खोलीत गेले.
पुढच्या खोलीत मेंहंदी काढण्याची लगबग सुरू, शनिवारी नानमुख असल्याने सर्व नातेवाईकांचा गोतावळा घरी आलेला. चार वाजता महिलाना बांगड्या भरण्यासाठी बोलावण्याची तयारी सुरू. नानमुखसाठी मंडप टाकण्याची तयारी सुरू असताना अचानक रडण्याचा आक्रोश आणि किंचाळ्या कानावर पडल्या.
वर पित्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. खूप प्रयत्न केले. मात्र त्याच उपयोग झाला नाही. वरपिता अशोक सरकाटे यांची प्राणज्योत मालवली होती. आनंदाचे क्षण दुःखात परावर्तित झाले होते. ज्या मंडपात मुलाच्या नानमुखचे सर्व विधी पार पडणार होते. त्याच मंडपात माजी सैनिक वर पिता यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.
महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी आणि सीमा सुरक्षा बलच्या सैनिकांनी त्यांना अखेरची मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. विवाहासाठी आलेल्या पाहुण्यांचे नयनातून अश्रुंच्या धारा ओघळत होत्या. मुलगा अमर, मुलगी आणि पत्नी यांचा आक्रोश पाषाणालाही पाझर फोडणारा होता. रात्री उशिरा साश्रू नयनांनी सरकटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ पसरली आहे.